जिल्ह्यात 1 लाख 15 हजारांहून अधिक बालकांना पोलिओ डोस देणार

 28 जून रोजी राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम; अकोला जिल्ह्यात 1 लाख 15 हजारांहून अधिक बालकांना पोलिओ डोस देणार

 दि. 25  राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवार, 28 जून 2026 रोजी अकोला जिल्ह्यात व्यापक पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनय  नावंदर आणि उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. सुशील कुमार वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांनी या मोहिमेचे नियोजन केले आहे.

या मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस पाजण्यात येणार* असून, जिल्ह्यात एकूण 1 लाख 15 हजार 438 बालकांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये महानगरपालिका क्षेत्र वगळता ग्रामीण भागातील 87 हजार 174 तर शहरी भागातील 28 हजार 244 बालकांचा समावेश आहे.

मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाभरात *तीन सदस्यीय 581 बूथ पथके तसेच दोन सदस्यीय 602 गुच्छ पथकांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय 72 ट्रान्झिट, 83 मोबाईल आणि 63 विशेष पथके कार्यरत राहणार असून, लसीकरणापासून वंचित राहणाऱ्या बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात बूथवर न आलेल्या लाभार्थ्यांना घरोघरी भेट देऊन पोलिओ डोस देण्यासाठी 1 हजार 694 घरभेट पथके* तयार करण्यात आली आहेत. मोहिमेसाठी आवश्यक लसींचा व साहित्याचा पुरेसा साठा सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आला असून, संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले आहे.राष्ट्रीय पोलिओ मोहिमेबाबत जनजागृती करण्यासाठी सोशल मीडिया, पोस्टर्स, बॅनर्स तसेच विविध प्रसारमाध्यमांच्या साहाय्याने व्यापक प्रचार सुरू आहे. आरोग्य विभागाकडून पालकांना आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी सांगितले की, सध्या देशात पोलिओचे रुग्ण आढळत नसले तरी इतर भागांतून संसर्गाचा धोका कायम आहे. त्यामुळे यापूर्वी बालकाला कितीही वेळा पोलिओची लस दिली असली तरी राष्ट्रीय पोलिओ मोहिमेदरम्यान प्रत्येक वेळी पोलिओ डोस देणे अत्यंत आवश्यक आहे. पोलिओमुक्त भारताचे स्वप्न कायम राखण्यासाठी आणि भविष्यातील धोका टाळण्यासाठी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना या मोहिमेत सहभागी करून पोलिओ डोस पाजावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.


"दोन थेंब जीवनाचे" या संदेशासह 28 जून रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेत सर्व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन  आरोग्य  विभागाने  केले आहे.

टिप्पण्या