बालसंगोपन योजनेबाबत भूलथापांना बळी पडू नये जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे आवाहन
बालसंगोपन योजनेबाबत भूलथापांना
बळी पडू नये
जिल्हा महिला व बालविकास
अधिकाऱ्यांचे आवाहन
अकोला, दि. 17: क्रांतिज्योती
सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचे अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत
विनामूल्य उपलब्ध करून दिले जातात. तथापि, काही व्यक्ती या अर्जांची विक्री करीत असल्याचे
निदर्शनास आले असून नागरिकांनी अशा व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे यांनी केले आहे.
बाल न्याय (मुलांची काळजी
व संरक्षण) अधिनियम व नियमांनुसार अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची
गरज असलेली बालके, कुमारी मातेची अपत्ये, अपंग बालके, कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांची
अपत्ये, विधवा महिलांची अपत्ये, दोन्ही पालक अपंग असलेली बालके, एकल पालकांची मुले,
घटस्फोटित अथवा विभक्त पालकांची मुले, परित्यक्त बालके तसेच दुर्धर आजारग्रस्त पालकांची
अपत्ये यांच्यासाठी ही योजना राबविण्यात येते.
योजनेच्या लाभार्थ्यांना
लाभ मंजूर झाल्यानंतर काही व्यक्तीकडून पैशांची मागणी केली जात असल्याचे तसेच अर्जांसाठी
मोठ्या प्रमाणात पैसे आकारले जात असल्याचे आढळून आले आहे. या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया
व आवश्यक मार्गदर्शन पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. त्यामुळे लाभ मिळवून देण्यासाठी
किंवा कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कोणालाही कोणत्याही प्रकारचे पैसे देऊ नयेत.
अर्जासाठी अथवा योजनेचा
लाभ मिळवून देण्यासाठी कोणी पैशांची मागणी करत असल्यास तात्काळ जिल्हा महिला व बालविकास
अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा