बालमजुरीमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा जिल्हा प्रशासनाचे आवाहन
बालमजुरीमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी सक्रिय
सहभाग नोंदवावा
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
अकोला, दि. ११ : बालकांचे हक्क सुरक्षित ठेवणे ही
प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. बालमजुरीमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी
सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना, तसेच महिला व बालविकास
विभागाने केले आहे.
दरवर्षी 12 जून हा दिवस जगभरात "जागतिक बालमजुरी
विरोधी दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे प्रमुख उद्दिष्ट बालमजुरीचे
निर्मूलन करणे, बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे तसेच त्यांना शिक्षण, आरोग्य व सुरक्षित
बालपणाचा अधिकार मिळवून देणे हे आहे.
बालमजुरी ही एक गंभीर सामाजिक समस्या असून ती बालकांच्या
शारीरिक, मानसिक, भावनिक व शैक्षणिक विकासाला बाधा आणते. प्रत्येक बालकाला शिक्षण घेण्याचा,
खेळण्याचा, सुरक्षित वातावरणात वाढण्याचा आणि सन्मानाने जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार
आहे. त्यामुळे 18 वर्षांखालील बालकांकडून कोणत्याही प्रकारची मजुरी करून घेणे हे कायद्याने
दंडनीय आहे.
या निमित्ताने सर्व नागरिक, पालक, व्यावसायिक, संस्था
व सामाजिक संघटनांनी बालमजुरीला ठाम विरोध करावा, बालकांना शाळेत पाठवावे आणि त्यांच्या
सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच 18 वर्षांखालील
कोणत्याही बालकाबाबत बालमजुरी, बालविवाह, बाल अत्याचार, बाल तस्करी अथवा इतर कोणत्याही
प्रकारचे शोषण होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ 1098 या चाईल्ड हेल्पलाईनच्या
टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय बाल कल्याण समिती, जिल्हा महिला व बाल
विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अथवा संबंधित सामाजिक संस्थांना माहिती
द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा