एकल महिला धोरणाबाबत जिल्हास्तरीय बैठकीत मंथन

 

 

 



एकल महिला धोरणाबाबत जिल्हास्तरीय बैठकीत मंथन

अकोला, दि. २४ : विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच इतर एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी स्वतंत्र आणि व्यापक एकल महिला धोरण तयार करण्यात येत आहे. या निर्मिती प्रक्रियेत स्थानिक स्तरावरील सूचना, अनुभव आणि अपेक्षांचा समावेश करण्यासाठी बैठक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात सोमवारी झाली.  

महिला व बाल विकास आयुक्त, जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांच्या मार्गदर्शनानुसार या बैठकीत एकल महिलांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी व्यापक व लोकाभिमुख धोरण निर्मितीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वयंसेवी संस्था व महिला संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.

राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉ. आशा मिरगे, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी सदस्य ॲड. संजय सेंगर, राज्य अन्न आयोगाच्या सदस्या माया इरातकर, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. अनिता गुरव, सदस्य ॲड. शीला तोषणीवाल, राजेश देशमुख, प्रा. प्रांजली जैस्वाल, डॉ. सीमा तायडे, नारी शक्ती फाऊंडेशनच्या सुमैय्या अली, स्थानिक तक्रार समितीच्या सदस्या ॲड. राधा मिश्रा, सामाजिक कार्यकर्त्या झिंगूबाई बोलके, जिल्हा सांख्यिकी अधिकारी स्वाती संघाशी, कौशल्य विकास विभागाचे श्री. देशपांडे, पुरवठा विभागाचे श्री. वाहूरवाघ, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नीता अंभोरे प्रेरणा स्वधर गृहाचे डॉ. प्रमोद अवघाते, डॉ.ईथापे,गिरीश पुसदकर,रूपाली पांडे,सखी वन स्टॉप सेंटर च्या केंद्र प्रशासक ॲड.मनीषा भोरे  आदी मान्यवर  उपस्थित होते.

केवळ समस्या मांडण्यापुरते मर्यादित न राहता त्यावर ठोस उपाययोजना सुचविणे, नवीन योजनांची आवश्यकता अधोरेखित करणे, विद्यमान योजनांमध्ये आवश्यक बदल सुचविणे तसेच संबंधित कायदे व नियमांमध्ये सुधारणा करण्याबाबत विविध मान्यवरांनी सूचना केल्या. रोजगार व उपजीविका, मालमत्ता व वारसा हक्क, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा, निवारा व पुनर्वसन तसेच शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भातही विविध सूचना प्राप्त झाल्या.

बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना व शिफारसी शासनाकडे सादर करण्यात येणार असून, एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रभावी व सर्वसमावेशक धोरण तयार करण्यास त्यांचा उपयोग होणार आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी लक्ष्मण हगवने यांनी यावेळी सांगितले. नितीन अहिर यांनी सूत्रसंचालन केले.  

विविध स्वयंसेवी संस्था, बाल संगोपन योजना राबविणाऱ्या संस्था, महिला संघटना, एकल महिलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी तसेच अभय केंद्राचे संरक्षण अधिकारी यांनी बैठकीत सहभाग घेतला. 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन