वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाबाबत बैठक प्रलंबित कामे मार्गी लावा, प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी - जिल्हाधिकारी वर्षा मीना

 

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाबाबत बैठक

प्रलंबित कामे मार्गी लावा, प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी 

-        जिल्हाधिकारी वर्षा मीना

अकोला, दि ९ : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे भविष्यात जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढण्यास मोठी मदत होणार आहे. पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन, शेतीसाठी उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी तसेच दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे प्रकल्पाशी संबंधित जमीन संपादन, मान्यता, प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी जबाबदारीने व समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.

नदीजोड प्रकल्पाच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, मृद व जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर, पाटबंधारे विभागाचे चिन्मय वाकोडे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान महसूल, सार्वजनिक बांधकाम, वन, जलसंपदा तसेच इतर संबंधित विभागांची भूमिका महत्त्वाची आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रलंबित बाबी तातडीने मार्गी लावाव्यात.

प्रकल्पाच्या टप्पा २ व ३ मध्ये प्रस्तावित कालवा अकोला जिल्ह्यातून जात असून प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी.  टप्पा २ मध्ये निम्न वर्धा जलाशय ते काटेपूर्णा जलाशय (१२६.९४५ किमी) आणि टप्पा ३ मध्ये काटेपूर्णा जलाशय ते नळगंगा जलाशय (१०९ किमी) जोडण्याचे प्रस्तावित आहे. प्रकल्पामुळे पावसावर अवलंबून असलेली शेती अधिक सुरक्षित होईल. पाणी उपलब्ध झाल्याने उद्योगधंद्याच्या विकासाला मदत होईल. शेती, पशुपालन व संबंधित व्यवसायांना फायदा होईल. ग्रामीण व शहरी भागांना वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील.

 

वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पात मुख्य कालव्याची लांबी ३८८.२८ किमी असून, लाभ क्षेत्र ४ लक्ष ४ हजार २८१ हे., तसेच सिंचन क्षमता ६ लक्ष ११ हजार १५० हे. असेल. प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता ९४ हजार ९६७ कोटी रू. आहे. मुख्य कालव्याच्या दोन्ही बाजूंना ५० धरणांचा प्रस्ताव आहे. त्यात ३२ नवीन धरणे असून, विद्यमान १८ पैकी १० धरणांची उंची वाढविण्यात येणार आहे.

 

अकोला जिल्ह्यात टप्पा-२ मध्ये मुख्य कालव्याअंतर्गत मूर्तिजापूर, अकोला, बार्शिटाकळी तालुक्यातील गावे समाविष्ट आहेत. साठवण स्थळांमध्ये कानडी, निम्न काटेपूर्णा, सिसा उदेगाव, हातोला, तसेच काटेपूर्णा प्रकल्पावरून प्रस्तावित उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहे. काटेपूर्णा ते नळगंगा लिंक ३ प्रकल्पाच्या नदीजोड मुख्य कालव्याची लांबी १०९ किमी आहे. मुख्य कालव्याच्या दोन्ही बाजूंना एकूण ८ धरणांचा प्रस्ताव आहे. त्यापैकी ७ नवीन प्रस्तावित असून, एका विद्यमान धरणाची उंची वाढविण्यात येणार आहे. टप्पा तीनमुळे अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील ९ तालुक्यांना लाभ होईल.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन