मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६

 १५ लक्ष ९८ हजार मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी होणार

पुनरीक्षण कार्यक्रमास मतदारांनी सहकार्य करावे

जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा मीना यांचे आवाहन  

अकोला, दि. १६ : भारत निवडणूक आयोगाकडून


मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदार संघातील एकुण १ हजार ७४१ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून १५ लक्ष ९८ हजार मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी सर्व मतदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.

 

कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे ३० जून ते २९ जुलै या कालावधीत घरोघरी भेट देऊन अंशतः भरलेले गणना पत्र प्रत्येकी दोन प्रतीत मतदारांना वाटप करतील. मतदार मागील विशेष संक्षिप्त पुनरिक्षणामधील मतदार यादीत स्वतःचे संबंधित नातेवाईकांचे नाव https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर तपासू शकतात आणि गणना पत्रातील माहितीची पडताळणी करुन दोन्ही प्रती मध्ये योग्य माहिती भरुन आणि स्वाक्षरी करुन, तसेच आपले अलीकडील काळात काढलेले छायाचित्र विहित ठिकाणी चिटकवून गणना पत्र बीएलओ यांच्याकडे जमा करावे.

 

अकोला जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदार संघातील एकुण १ हजार ७४१ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून १५ लक्ष ९८ हजार मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेत निवडणूक यंत्रणेसह राजकीय पक्षांची भूमिका व सहकार्य सुध्दा महत्वाचे राहणार आहे. यास्तव राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर आपले प्रतिनिधी नियुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

मतदार नोंदणी अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण घेतले आहे. तसेच मतदारांच्या मदतीसाठी जिल्हास्तरावर मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे. मतदार यादी तयार करण्याचा अर्हता दिनांक १ ऑक्टोबर आहे. प्रारुप मतदार यादी दिनांक ५ ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून त्यावर प्राप्त होणा-या दावे व हरकतीवरील निर्णयानंतर दिनांक ७ ऑक्टोबर रोजी मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांमध्ये मतदारांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन