मधमाशापालनासाठी अनुदानित मध केंद्र योजना; अर्ज करण्याचे आवाहन

 

अकोला, दि. 12 : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यभर मध केंद्र योजना (मधमाशापालन) राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान, शासनाच्या हमीभावाने मध खरेदी, विशेष प्रशिक्षण सुविधा तसेच मधमाशा संवर्धनाबाबत जनजागृतीचा लाभ मिळणार आहे.
योजनेअंतर्गत वैयक्तिक मधपाळांना १० मधपेट्यांचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी अर्जदार साक्षर असणे, वय १८ वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक असून स्वतःची शेती असलेल्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
प्रगतिशील मधपाळ व्यक्ती केंद्रचालक म्हणून पात्र ठरण्यासाठी अर्जदार किमान दहावी उत्तीर्ण, वय २१ वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. तसेच स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावावर किमान एक एकर शेती अथवा भाडेतत्त्वावरील शेती असावी. मधमाशी पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असणे आवश्यक आहे.
संस्था केंद्रचालक म्हणून पात्र होण्यासाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या मालकीची किंवा भाडेतत्त्वावरील किमान १००० चौ. फूट क्षेत्रफळाची इमारत असणे आवश्यक आहे. तसेच मधमाशी पालन, प्रजनन व मध उत्पादनासंदर्भात प्रशिक्षण देण्याची सुविधा संस्थेकडे असावी.
केंद्रचालकांना ५० मधपेट्या प्रत्येकी ४,२०० रुपये दराने ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार असून उर्वरित ५० टक्के रक्कम संबंधित कार्यालयात आगाऊ जमा करणे बंधनकारक राहील.
लाभार्थी निवडीनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्याबाबत मंडळास बंधपत्र देणे आवश्यक राहील. मंडळामार्फत प्रशिक्षण मोफत दिले जाणार असून निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. योजनेचे अर्ज महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालय, अकोला येथे उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, अकोला (मो. ७७७४०१३८०९, ९१७२७४४४७४, दूरध्वनी : ०७२४-२४१४२५०) तसेच संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाबळेश्वर, जि. सातारा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन