प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशक वर्षपूर्तीनिमित्त ९ जून रोजी राज्यभर विशेष आरोग्य उपक्रमांचे आयोजन

 प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशक वर्षपूर्तीनिमित्त ९ जून रोजी राज्यभर विशेष आरोग्य उपक्रमांचे आयोजन


: गर्भवती महिलांना दर्जेदार व सर्वसमावेशक प्रसूतिपूर्व आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या (PMSMA) १० वर्षपूर्तीनिमित्त राज्यात ९ जून २०२६ रोजी विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार असून, राज्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये व्यापक जनजागृती व तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे.


प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची सुरुवात ९ जून २०१६ रोजी करण्यात आली होती. या अभियानांतर्गत गर्भधारणेच्या दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीतील महिलांना दर महिन्याच्या ९ तारखेला मोफत, गुणवत्तापूर्ण आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतिपूर्व आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते. या अभियानामुळे उच्च जोखमीच्या गर्भधारणा (High Risk Pregnancy) वेळेत ओळखणे, योग्य उपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे आणि माता-बाल मृत्यूदर कमी करण्यास मोठी मदत झाली आहे.


१० वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील आयुष्मान आरोग्य मंदिरांसह प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये आणि पीएमएसएमए नामांकित आरोग्य संस्थांमध्ये विशेष सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सत्रांमध्ये गर्भवती महिलांची तपासणी, रक्त व मूत्र चाचण्या, आवश्यकतेनुसार सोनोग्राफी संदर्भ, समुपदेशन आणि उच्च जोखमीच्या गर्भवतींची विशेष नोंदणी करण्यात येईल.


विशेषतः उच्च जोखमीच्या गर्भवती महिलांचा शोध घेऊन त्यांचे नियमित फॉलो-अप, उपचार आणि व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जाणार आहे. आशा व एएनएम कर्मचाऱ्यांमार्फत किमान तीन फॉलो-अप भेटी सुनिश्चित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच वंचित राहिलेल्या गर्भवती महिलांपर्यंत सेवा पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.


या उपक्रमाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण मातृ आरोग्य सेवांबाबत जनजागृती करणे, सुरक्षित गर्भधारणेला प्रोत्साहन देणे, कुटुंब व समुदायाचा सहभाग वाढविणे तसेच पीएमएसएमएच्या दहा वर्षांतील यशस्वी वाटचालीचा आढावा घेणे हा उद्देश आहे. राज्यभर पोस्टर्स, बॅनर्स, समाजमाध्यमे, स्थानिक माध्यमे आणि समुदाय बैठकींच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.


“PMSMA ची १० वर्षे – सुरक्षित गर्भधारणा, निरोगी माता, सक्षम भारत” या घोषवाक्यानुसार हे विशेष उपक्रम आयोजित करण्यात येणार असून, अधिकाधिक गर्भवती महिलांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन