जिल्ह्यात १२ हजार ५९६ परीक्षार्थी शिक्षक पात्रता परीक्षा देणार
जिल्ह्यात १२ हजार ५९६ परीक्षार्थी
शिक्षक पात्रता परीक्षा देणार
अकोला, दि. २३ : शिक्षक पात्रता परीक्षा
(महाटीईटी) २०२६ रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी होणार असून, परीक्षेसाठी अकोला शहरात
एकूण २५ परीक्षा केंद्रे निश्चित आहेत.
सदर परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात
येणार असून पेपर क्र. १ सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या वेळेत, तर पेपर क्र. २ दुपारी
२.३० ते सायंकाळी ५.०० या कालावधीत होणार आहे. पेपर क्र. १ साठी १९ केंद्रांवर ५ हजार
५५६ परीक्षार्थी, तर पेपर क्र. २ साठी २५ केंद्रांवर ७ हजार ४० परीक्षार्थी असे एकूण
१२,५९६ परीक्षार्थी परीक्षेला बसणार आहेत. यापैकी ३१३ दिव्यांग परीक्षार्थींना नियमानुसार
अनुग्रह कालावधी व लेखनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
परीक्षार्थींनी परीक्षेसाठी प्रवेशपत्रासह
आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदान ओळखपत्र यापैकी एक वैध फोटो
ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे.
परीक्षेच्या सुयोग्य आयोजनासाठी जिल्हाधिकारी
यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व सनियंत्रण समिती गठीत करण्यात
आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प. अकोला) हे समितीचे उपाध्यक्ष असून शिक्षणाधिकारी
(प्राथमिक) सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयात
जिल्हा सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी बि. आर. हायस्कूल,
अकोला येथे जिल्हा संकलन कक्ष उभारण्यात आला असून उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची
जिल्हा परिरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय ६ झोनल अधिकारी, २५ सहायक
परिरक्षक, २५ केंद्रसंचालक आणि ४९२ पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपिक व सेवकांची नियुक्ती
करण्यात आली आहे.
परीक्षेदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी
बायोमेट्रिक तपासणी, फेस स्कॅनिंग व मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात येणार आहे. तसेच
सर्व परीक्षा केंद्रे व वर्गखोल्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित
लाईव्ह सीसीटीव्ही देखरेख राहणार आहे. “फोटो व्ह्यू” प्रणालीद्वारे
उमेदवारांची पडताळणी करण्यात येणार असून “कनेक्ट व्ह्यू” प्रणालीमुळे
केंद्र संचालक, जिल्हा नियंत्रण कक्ष व परीक्षा परिषद, पुणे यांच्यात त्वरित संपर्क
साधता येणार आहे.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व शिक्षणाधिकारी
(योजना) यांचे भरारी पथक परीक्षा केंद्रांवर नजर ठेवणार असून शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
हे संपूर्ण परीक्षेचे नियंत्रण अधिकारी म्हणून कार्यवाहीवर लक्ष ठेवणार आहेत. परीक्षेच्या
पूर्वतयारीसाठी दि. १२ जून २०२६ रोजी जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच दि. १७ जून २०२६ रोजी बि. आर. हायस्कूल येथे नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची
बैठक घेऊन आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.
परीक्षार्थींनी वेळेआधी केंद्रावर उपस्थित
राहून सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा