जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा कृती आराखड्यास मंजूरी
अकोला,दि.2 (जिमाका)- जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील
ग्रामीण भागातील नळ पाणीपुरवठयाच्या योजनाच्या कृती आराखड्यास जिल्हा पाणी व
स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंजूरी दिली.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची बैठक घेण्यात
आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा पाणी व स्वच्छता
मिशनचे सहअध्यक्ष सौरभ कटीयार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता
निलेश राठोड, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस एम गायकवाड,
वरिष्ठ भुवैज्ञानिक आर. टी. शेलार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता
राजेंद्र चौधरी, मिलींद जाधव, श्रीमती कांचन उमाळे, वन विभागाचे आर. ए. ओवे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभागाचे प्रतिनिधी आर.के. गोडले यांची
प्रमुख उपस्थिती होती.
राज्याच्या ग्रामीण भागातील
प्रत्येक कुटूंबास नळजोडणीव्दारे सन 2024 पर्यंत माणसी प्रतिदिन 55 लीटर पाणी
उपलब्ध करुन देणे हे जलजीवन मिशन अंतर्गत उदिष्ट असून यासाठी केन्द्र शासन व राज्य
शासन प्रत्येकी 50 टक्के व लोकवर्गनीतून 10 टक्के निधी उपलब्ध करावयाचा आहे. योजना
पूर्ण झाल्यावर यशस्वीपणे चालविणाऱ्या व देखभाल दुरुस्ती योग्य रितीने केल्यास
ग्रामपंचायतीला एकूण खर्चाच्या 10 टक्के रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्यात येणार
आहे. जिल्ह्यात कृषि आराखड्या अंतर्गत जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधीकरण
यांच्याकडून 227 योजना प्रस्तावीत केल्या असून यामध्ये पूर्ण झालेल्या योजनाची
रिट्रोफिटींग करणे-151 योजना, प्रगतीत असलेल्या योजनाची रिट्रोफिटींग करणे-20
योजना, प्रगतीत असलेल्या सात योजना व नवीन प्रस्तावित 49 योजनाचा समावेश आहे.
यासाठी 814 कोटी 5 लक्ष निधी लागणार असून
सन 2020-2021 करीता 46 कोटी 71 लक्ष ऐवढा
निधी अपेक्षित आहे. यासाठी योजनाचा प्रस्ताव तयार करुन मंजूरीसाठी शासनाकडे सादर
करण्यात आले आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील 2
लक्ष 50 हजार कुटुंबापैकी 1 लक्ष 17 हजार 925 कुटुंब नळयोजनेचा लाभ घेत आहे.
उर्वरित कुटुंबापैकी यावर्षी 53 हजार 810 कुटुंबाला नळ योजनेव्दारे पाणी पुरवठा
करण्याचे उदिष्ट असून 36 हजार 284 कुटुंबाला पाणी पुरवठा करण्याचे कामे पूर्ण झाले
आहे. जिल्ह्याचा महाराष्ट्रात चौथा क्रमांक आहे.
जल जीवन अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील 1390 अंगणवाडीपैकी 1358 अंगणवाड्याना
पिण्यांच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील 912 शाळांपैकी 904
शाळांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात
आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा