कुष्ठ व क्षयरुग्ण शोध अभियान घरोघरी सर्वेक्षण करुन मोहिम यशस्वी करा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 




अकोला,दि. 27 (जिमाका)- समाजातील क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेवून निदान निश्चिती करुन औषोधोपचार सुरु करणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिम दि.  1 ते 16 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तरी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी  घरोघरी सर्वेक्षण करुन रुग्णांचा शोध घ्यावा व ही मोहिम यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

 जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिम दि.  1 ते 16 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा नियोजन भवनात पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. एम.एम. राठोड, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राजश्री देशमुख, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, जिल्हा प्रसिद्धी व  माध्यम अधिकारी प्रकाश गवळी  यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील दोन लक्ष 19 हजार 686 घरांना भेटी देवून कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णाचा शोध घेण्यात येईल. त्यासाठी 993 चमू तयार करण्यात आले आहेत. हे चमू दि. 1  ते 16 डिसेंबर या कालावधीत घरोघरी  भेट देणार आहेत. या सर्वेक्षणाचे काम आशा सेविका व पुरुष स्वंयसेवक करणार आहे. एकूण 14 दिवसाच्या कालावधीत दररोज एका चमुमार्फत त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागात 20 घरे व शहरी भागात 25 घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. घरातील सर्व सदस्यांची तपासणी करुन घराच्या दरवाजावर खूण करण्यात येणार आहे. क्षयरोग रोगाची लक्षणे आढळल्यास रुग्णांच्या थुंकीचे एक तासाच्या अंतराने दोन नमूने घेण्यात येतील. आवश्यकता वाटल्यास छातीचा  एक्स-रे काढण्यात येईल. तसेच कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास त्यांची प्राथमिक  तपासणी करण्यात येईल.  यासाठी सर्व नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. एम.एम. राठोड यांनी दिली. या मोहिमेबाबत पथनाट्य, पोस्टर्स, बॅनर्स व ध्वनीक्षेपकाव्दारे जनजागृती करण्यात येणार आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ