धार्मिक व प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

 

अकोला,दि.15(जिमाका)- कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार सोमवार दि. 16 नोव्हेंबर 2020 पासून धार्मिक स्थळे, प्रार्थना व पुजा स्थळांना संबंधित धार्मिक स्थळांच्या ट्रस्ट व बोर्ड यांचे विश्वस्थ यांनी ठरविलेल्या वेळेनुसार उघडण्याबाबतचे प्रतिबंधात्मक आदेश अटी व शर्तीच्‍या अधिन राहून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले आहे.

मिशन बिगेन अगेन अंतर्गत सोमवार दि. 16 नोव्‍हेंबर पासून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्‍यात आल्‍या आहेत.  कोविड-19 चा प्रादुर्भाव व फैलाव होवू नये या करिता सामाजिक अंतर व इतर आवश्‍यक उपाययोजनेचा अवलंब करुन अकोला जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्राबाहेरील (Outside the Containment Zone)  दि. 16 नोव्‍हेंबर  पुढील आदेशापर्यंत सुरु करण्यास याद्वारे परवानगी देत आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

65 वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती, कोमार्बीड व्यक्ती, गर्भवती महिला आणि 10 वर्षापेक्षा कमी वयाची मुले यांनी शक्यतोवर घरातच रहावे. या करिता धार्मिक संस्था यांनी सामान्य प्रतिबंधात्मक उपायांमध्ये कोविडाचा धोका कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपायांचा समावेश करावा. या उपाययोजना (सर्व सेवाधारी आणि भाविकभक्त) यांनी नेहमी अवलंबविल्या पाहिजेत. यात पुढील बाबीचा समावेश आहे.

सार्वजनिक ठिकाणी किमान सहा फूट अंतर ठेवणे आवश्यक राहील, फेस कव्हर व मास्कचा  वापर करणे अनिवार्य आहे, साबणाने (किमान 40-60 सेंकदांसाठी) वारंवार हात धुवावे,  जेथे शक्य असेल तेथे अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर्स (कमीतकमी 20 सेंकद) चा वापर करावा, खोकलतांना किवा शिंकतांना नाक व तोंड झाकण्यासाठी टिशू पेपर, रुमाल अथवा हाताच्या बाजूचा वापर करावा, आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने हेल्पलाईनद्वारे आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, धार्मिक, पूजा व प्रार्थना स्थळांच्या आवारामध्ये थुंकण्यास सक्त मनाई रहील, तसे आढळल्यास आवश्यक दंड आकारण्यात यावा व सर्व सेवाधारी आणि येणाऱ्या भाविकभक्त यांनी आरोग्य सेतू ॲपचा वापर करावा.

धार्मिक स्थळांच्या विश्वस्थ व व्यवस्थापकांनी करावयाच्या उपाययोजना

प्रवेशव्दारावर हात स्वच्छ करण्याकरिता सॅनिटायझर डिस्पेंसर व थर्मल स्क्रीनिंगची सुविधा उपलब्ध करावी, ज्या व्यक्तीना कोविड-19 ची लक्षणे नाहीत अशा व्यक्तींना परवानगी देण्यात यावी, मास्क परिधान केलेला व्यक्तीना प्रवेश देण्यात यावा, कोविड-19 चे अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्याचे दृष्टीने सर्व पूजास्थानामध्ये पोस्टर्स, भितीपत्रके, ऑडियो आणि व्हिडिओ क्लिप या साधनांचा वापर नियमितपणे करावा, धार्मिक, पूजा व प्रार्थना स्थळांमध्ये खेळती हवा राहण्याचे दृष्टीने दर्शनाकरिता वेळेनुसार भक्तांची संख्या निश्चित करण्यात यावी, भाविक भक्तांनी आपली पादत्राणे व शुज शक्यतोवर स्वतःच्या वाहनांमध्ये अथवा स्वतंत्र स्टॉलमध्ये ठेवावे, पार्किगच्या ठिकाणी आणि परिसराच्या बाहेर योग्य अंतरावर सामाजिक अंतर नियमांचे पालन करावे, आवाराच्या बाहेरील आणि परिसरातील दुकाने, स्टॉल्स, कॅफे इत्यादी व्यवसायीकांनी सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे, दर्शनाकरिता असलेल्या रांगामध्ये सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी विशिष्ट चिन्हांचा वापर करावा.

 शक्यतोवर भाविकभक्तासाठी येण्याकरिता व जाण्याकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी,  प्रवेशासाठी रांगा लावताना प्रत्येक वेळी किमान सहा  फूट शारीरिक अंतर राहील याकरिता पूजास्थळाचे विश्वस्थ यांनी  खबरदारी घ्यावी, नागरीकांनी धार्मिक, पूजा व प्रार्थना स्थळांच्या आवारामध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपले हात, पाय साबणाने व पाण्याने धुवावेत, सामाजिक अंतरावर बसण्याची व्यवस्था करण्यात यावी,  वातानुकूलन व व्हेंटिलेशनसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करावे. सर्व वातानुकूलन उपकरणांचे तापमान आसन 24-30 डीग्री सेंटीग्रेटच्या श्रेणीत असले पाहिजे सापेक्ष आर्द्रता 40 ते 70 डिग्रीच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. शक्य तीतकी खेळती हवा राहील याबाबात नियोजन करावे, पुतळे व पवित्र पुस्तके इत्यादिना स्पर्श करता येणार नाही, मोठ्या प्रमाणावर गर्दी होणारे धार्मीक कार्यक्रम व सभा घेता येणार नाही.

कोविड-19 चा संक्रमणाचा संभाव्य प्रसार होण्याचा धोका लक्षात घेता, भक्ती संगीत व  गाणी वाजविली जावू शकतात. गायक, गायिका किवा गायण गटांना परवानगी राहणार नाही,   एकमेकांना अभिवादन करताना शारीरिक संपर्क टाळावा, प्रार्थनेकरिता भक्तांनी स्वतःची प्रार्थना चटई किंवा कापडाचा वापर करावा, धार्मिक स्थळाच्या आत प्रसाद वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडण्यास परवानगी राहणार नाही, धार्मिक स्थळांमधील सामुदायिक स्वयंपाकघर, लंगर, अन्नदान इत्यादी यांनी अन्न तयार करताना आणि वितरण करताना शारीरिक अंतराच्या निकषांचे पालन करावे,  धार्मीक स्थळाचे परिसरामधील प्रसाधनगृहाची प्रभावी स्वच्छता ठेवण्यात यावी, धार्मिक स्थळाच्या व्यवस्थापनाद्वारे वारंवार साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करण्यात यावे, धार्मिक स्थळाच्या परिसरातील तळजमीन वारंवार स्वच्छ करावी, भाविक भक्तांनी किंवा कर्मचाऱ्यांनी वापरलेले मास्क व ग्लोव्हजची योग्य विल्हेवाट लावावी,  धार्मिक स्थळांच्या काम करणारे कर्मचारी कामगार यांनी कोविड-19 चे सुरक्षेच्या अनुषंगाने कोविड-19 च्या नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी. कामावर हजर होताना व गर्दिच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी व कामगार यांनी कोविड-19 ची चाचणी करुन घ्यावी, शौचालय आणि खाण्याच्या ठिकाणी गर्दि टाळावी, सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणची माहिती संबंधित पोलिस स्टेशन, स्थानिक स्वराज्य संस्था यांना नियमित सादर करावी.

धार्मिक, प्रार्थना व पुजा स्थळ याठिकाणी संशयीत व्यक्ती आढळून आल्यास पुढील उपाययोजना करावे. आजारी असलेल्या व्यक्तीना विलगीकरणात ठेवण्यात यावे, डॉक्टरांनी तपासणी करेपर्यंत मास्कचा वापर करण्यात यावा, जवळच्या वैद्यकीय सुविधा (रुग्णालय व क्लिनिक) त्वरीत कळविण्यात यावे अथवा राज्य किवा जिल्हा हेल्पलाईनवर संपर्क करावा, नियुक्त केलेल्या सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाव्दारे (जिल्हा आरआरटी, उपचार करणारी चिकीत्सक) जोखीम मुल्यांकन केले जाईल. प्रार्दुभाव व फैलाव रोकण्याच्या दृष्टिने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, बाधित व्यक्ती आढळलेल्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. कोविड-19 चे अनुषंगाने केन्द व राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील. तसेच निर्गमित केलेले आदेशांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.  

 सदरचे आदेश दि. 16 नोव्हेंबर  पासून  संपूर्ण अकोला  शहर व जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ