जबाबदारीची ‘जपणूक’ आणि सकारात्मक ‘गुजराण’ दिव्यांग दाम्पत्याने घालून दिले आदर्श उदाहरण

 




अकोला,दि.27 (जिमाका)- कोरोनाच्या साथीमुळे अवघं जीवनमान बदललंय. जीवनाचे आयामच नवे झाले. सामान्य धडधाकट व्यक्तिंची ही कथा तर निसर्गाने ज्यांना न्यूनत्व दिलंय त्या दिव्यांगांची काय कथा! अकोला शहरातील सुभाष माहुलकर या दृष्टीहीन दिव्यांग व्यक्तीने शासनाच्या ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या आवाहनाला प्रतिसाद देत, कुटुंबाची जबाबदारी व व्यवसाय सांभाळत आपली गुजराण सकारात्मकतेने सुरु ठेवली आहे.

सुभाष भिमराव माहुलकर हे रणपिसेनगर राऊतवाडी रोड या भागात  भाजीपाला विक्रीचे दुकान चालवतात. शिवाय मशरुम, पनीर इ. सारख्या वस्तुही विकतात. त्यांनी त्यांच्या भाजीपाला विक्री केंद्राचे नाव ‘आत्मनिर्भर’ ठेवले आहे. सुभाष यांच्या पत्नीही दिव्यांग असून त्या अस्थिव्यंग आहेत. त्याही त्यांना व्यवसायात मदत करतात. त्यांना दोन अपत्य आहेत. त्यांच्या 74 वर्षांच्या वडीलांच्या संगोपनाची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. नुकतेच त्यांच्या एका भावाचेही पुण्यात निधन झाले. आता त्यांच्या कुटुंबाचेकर्ते पुरुष सुभाष हेच आहेत. ही सर्व जबाबदारी ते हसतमुखाने पार पाडत आहेत.

सुभाष यांचे शिक्षण  12 वी (उत्तीर्ण) पर्यंत झाले आहे. व्यायामाची आवड असल्याने त्यांनी शरीरसौष्ठवात उत्तम यश संपादन केले. देशात अनेक ठिकाणी त्यांनी शरीरसौष्ठव स्पर्धा गाजवल्यात; त्यात अनेक पारितोषिकेही मिळविलीत. या आवडीमुळे त्यांनी मसाज थेरपीचा डिप्लोमाही केलाय.  व्याधीग्रस्तांना ते मसाज करुन देत असतात. म्हणूनच त्यांनी हा व्यवसाय निवडला.  शहरातील एका  जिम मध्ये ते सेवा देतात. त्यावर त्यांची उत्तम गुजराण होत होती. तशातच कोरोनाची साथ आली. लॉकडाऊन झालं. अनेकांच्या व्यवसायाप्रमाणे त्यांच्या व्यवसायावरही गदा आली. मसाज म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या शरिराला स्पर्श करणे अपरिहार्य असल्याने त्यांचा व्यवसाय जवळ जवळ बंद झाला.

सुभाष यांनी सांगितले की, त्यांना व त्यांच्या पत्नी सुषमा यांना दिव्यांग व्यक्तिंना शासनाकडून  मिळणारे मानधन मिळते. शिवाय रेशन मधुन मिळणारे धान्य इ.चा पुरवठा सुरळीत होता. पण रिकामे राहून जगणे पसंद नव्हते. त्यांनी कुटुंबाच्या जबाबदारीचे पालन करण्यासाठी आणखी हातभार लागावा म्हणून भाजी पाला, कांदे बटाटे, लसूण इ. स्टॉल सुरु केला. सोबत मशरुम, पनीर यासारखे खाद्यपदार्थही  विक्रीला ठेवले.  ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याने त्यातून अधिकचे उत्पन्न ते मिळवू लागले.

हे सगळं करतांना ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या शासनाच्या आवाहनाला या कुटुंबाने प्रतिसाद दिलाय. घरातले सगळे सदस्य वारंवार हात धुणे, सॅनिटाईझ करणे,  मास्कचा वापर करणे, परस्परांपासून  अंतर राखणे यासर्व बाबींचे पालन ते करत असतात.  साहजिकच आजपर्यंत हे कुटूंब सुरक्षित आहे.

नेत्रहिन अवस्थेत हस्तस्पर्श हे महत्त्वाचे  ज्ञानेंद्रिय समजले जाते. कोरोनाच्या प्रतिबंधात स्पर्शही टाळायचा आहे. तरी देखील आपली  व आपल्या कुटुंबियांची जबाबदारी  सांभाळून कुटुंबियांसह स्वतःला सुरक्षित ठेवणाऱ्या सुभाष यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. समाजातील सर्वच कुटुंबप्रमुखांनी  सुभाष यांच्यासारखी जबाबदारी पालन करणे अपेक्षित आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ