जिल्हा नियोजन समितीची बैठक:विकासकामांचे परिपूर्ण नियोजन करा- पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू


            अकोला,दि.२५(जिमाका)-  जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्ह्यात होणाऱ्या विकासकामांचे नियोजन हे परिपूर्ण असले पाहिजे, जेणेकरुन जनतेला वेळेत या विकासकामांचा लाभ झाला पाहिजे,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती , भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार कल्याण विभागाचे राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी आज येथे दिले. जिल्हा नियोजन समितीच्या आजच्या बैठकीत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याच्या २२३ कोटी ९४ लाख ५८ हजार रुपयांच्या नियतव्ययाच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली.
            येथील नियोजन सभागृहात आज जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी  जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधानपरिषद सदस्य आ. गोपीकिशन बाजोरिया,  विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे,आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
            यावेळी  सन २०२०-२१ साठी सर्वसाधारण योजनेसाठी  १२५ कोटी ५४ लाख रुपये , अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ८६ कोटी ३१ लाख  रुपये तर आदिवासी उपयोजनेसाठी  १२ कोटी ९ लाख ५८ हजार अशा एकूण २२३ कोटी ९४ लाख ५८ हजार रुपयांच्या नियतव्ययाच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच गत आर्थिक वर्षातील खर्चाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील विविध यंत्रणांनी नियोजन समितीच्या निधीतून करावयच्या विकासकामांचे नियोजन काटेकोर करावे, विहित वेळेत कामे पूर्ण होतील याची खबरदारी घ्यावी, अशा सुचनाही केल्या. यावेळी झालेल्या चर्चेत लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ