जिल्हा आढावा बैठक:सेवा हमी कायद्यानुसार प्रशासकीय कामकाज करा- पालकमंत्री ना.बच्चू कडू



अकोला,दि.१५(जिमाका)-शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात, तसेच विकासकामांसाठी लागणारा कालावधी व निधी विहित वेळेत खर्च करण्यात होणाऱ्या दिरंगाईबद्दल यंत्रणेतील जबाबदार घटकावर कारवाई होणे आवश्यक असून ही जबाबदारी निश्चित करण्यासाठी सेवा हमी कायद्यानुसार प्रशासकीय कामकाज केले पाहिजे,असे निर्देश असे निर्देश, राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, महिला व बालविकास,शालेय शिक्षण व कामगार कल्याण राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.
आज ना.कडू यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभागृहात जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर अर्चना मसने, विधान परिषद सदस्य आ. गोपीकिशन बाजोरिया, विधानसभा सदस्य आ.गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ.रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख आदी लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या निधीतून वैष्णव देवी महिला बचत गटाच्या महिलांना शेती अवजारांचे वाटप ना.कडू यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ना. बच्चू कडू यांनी प्रत्येक विभागनिहाय आढावा घेतला. जिल्हाधिकारी पापळकर , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी संबंधित यंत्रणेचा आढावा सादर केला. यावेळी ना. कडू यांनी प्रशासनास पिक विमा योजना, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, तसेच अवकाळी पाऊस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्यावयाचा मोबदला  याबाबत लाभ वितरणाची सद्यस्थिती जाणून घेतली. याबाबत प्रशासनाने वेळीच लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला मदत होणे आवश्यक असून त्यात कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही,असे त्यांनी बजावले.
प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी सेवा हमी कायदा तयार करण्यात आला असून या कायद्याची अंमलबजावणी केल्यास दिरंगाईस वा बेजबाबदारपणाबद्दल जबाबदारी निश्चित करता येते. त्यामुळे प्रशासकीय कामकाज सेवा हमी कायद्यान्वये करावे,असे निर्देश ना. कडू यांनी यावेळी दिले. याप्रसंगी  त्यांनी दिव्यांगांच्या कल्याणाच्या योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना,  आरोग्य सेवा याबाबतही आढावा घेतला तसेच जिल्हा वार्षिक योजना निहाय आढावा घेतला. या चर्चेत लोकप्रतिनिधींनीही सहभाग घेतला. सभेचे संचलन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.
जिल्हा परिषदेतही आढावा
पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी  जिल्हा परिषदेस भेट देऊन पदवीधर अंशकालीन उमेदवार भरतीबाबत आधावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड तसेच अन्य विभागप्रमुख उपस्थित होते. या संदर्भातील शासनस्तरावर प्रलंबित अडचणींबाबत माहिती संकलित करुन जिल्हा परिषद प्रशासनाने तयार करुन याबाबत मंत्रालयस्तरावर बैठक घेण्याबाबत त्यांनी आश्वासित केले. तसेच याबाबत कंत्राटी नियुक्त्यांसंदर्भात शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी,असे निर्देशही त्यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ