जैविक शेती स्वत: करा आणि इतरांना सांगा --जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


वृत्त क्रमांक- 40
               



        
        अकोला,दि.16 (जिमाका)-  शेतक-यांनी जैविक शेती करुन अन्य  शेतक-यांना जैविक शेती करण्‍यासाठी मार्गदर्शन करून प्रोत्साहीत करा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आज राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (गळित धान्य विकास कार्यक्रम) व राष्ट्रीय कृषि विकास  योजनेंतर्गत एक दिवशीय प्रशिक्षण वर्गाचे कृषि विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, जैविक शेती मिशन,  आत्मा यांच्या  संयुक्त विद्यमाने  आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैविक शेती  मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे हे होते. यावेळी जिल्हा  अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ, डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन प्रकल्प उपसंचालक  आरीफ शहा,  डॉ. पंजाबराव  देशमुख कृषि विद्यापिठाचे सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण  केन्द्रांचे मुख्य शास्त्रज्ञ  डॉ. आदिनाथ पसलावार , विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे,    जिल्हा कृषि अधिकारी मुरली इंगळे , उपविभागीय कृषि अधिकारी अजय कुलकर्णी ,सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर,  सेवानिवृत्त  कृषि अधिकारी कुवरसिंह मोहने  यांची प्रमुख  उपस्थिती होती.
            जैविक शेती करणा-या  शेतक-यांना  एकत्र आणणे, शेतक-यांना जैविक शेती करण्यासाठी प्रवृत्त करणे, सेंद्रिय शेती मालाचे  प्रमाणिकरण करण्यासाठी  मार्गदर्शन बाबत  या  कार्यशाळेत मार्गदर्शन  करण्यात येणार  असल्याची माहिती श्री. पापळकर यांनी दिली.
            शेतीमध्ये  मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर  केल्याने शेतजमीनी नापीक  झाल्या आहे. या शेतीमध्ये शेणखत व सेंद्रिय खताचा वापर करुन सेंद्रिय शेती करणे ही काळाची गरज असल्याची माहिती अध्यक्षीय भाषणातून प्रकाश पोहरे यांनी दिली.
            या प्रशिक्षण वर्गामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन योजना , सेंद्रिय शेती काळाची गरज, सेंद्रिय कृषि मालाचे प्रमाणीकरण , करडई,  भुईमुग पीक लागवड तंत्रज्ञान, खरीप हंगाम 2020 मध्ये सोयाबीन  बियाणे कमतरता लक्षात घेत शेतक-यांनी घरगुती बियाण्यांचा वापर करण्याचे तंत्रज्ञान , कापुस , हरभरा  पिकावरील एकात्मिक कीड व्यवस्थापन, मका पिकावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन, किटकनाशके हाताळताना  घ्यावयाची काळजी, शेतकरी उत्पादक कंपनी व गट शेतीचे  महत्व व योजना , आत्मा  योजनेत कृषि मित्रांची  प्रमुख भुमिका  आदी विविध विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक   सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी  अशोक अमानकर यांनी केले.  यावेळी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
00000
           

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ