दिव्यांग प्रमाणपत्र वितरण अभियान दिव्यांगाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध-पालकमंत्री ना.बच्चू कडू


              अकोला,दि.१५(जिमाका)-   शासनाव्दारे दिव्यांगासाठी समाज कल्याण विभागातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांमध्ये दिव्यांगांना रोजगारासाठी बिज भांडवल ,उद्योग उभारणीसाठी अनुदान , दिव्यांग अव्यंग विवाहित जोडप्यांना प्रोत्साहन अनुदान, दिव्यांग पेन्शन योजनाचा समावेश असुन दिव्यांगाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.
                     जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने दिव्यांग प्रमाणपत्र वितरण अभियानाच्या शुभारंभ ना. कडु यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या कर्मचारी सभागृहात  करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत  होते.  यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  आयुष प्रसाद , शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे,  उप अधिष्ठाता डॉ. कुसूमाकर घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
                     यावेळी ना. कडु म्हणाले की, दिव्यांगानी  स्वत: ला  कमी समजू नये. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन मजबुत बना, आत्मनिर्भर बना,असे आवाहन त्यांनी केले.  शासनाच्या विविध योजना  दिव्यांगांच्या घरापर्यंत पोहचवाव्यात, यापुढे  राज्याचे  आर्थ‍िक बजेट  तयार करतांना दिव्यांगाचा विचार प्रथम व्हावा यासाठी  प्रयत्न करु, असे आश्वासन ना. बच्चू कडु यांनी दिले. 
                     यावेळी ना.बच्चू कडु यांच्या हस्ते अडगाव येथील  अंधव्यक्ती  मोबीन खान व सस्ती येथील शुभम राजेंद्र  देशमुख   यांना  किराणा दुकानासाठी बिज भांडवल, दिव्यांग पेन्शन योजनेतंर्गत सैय्यद मोईन अली व  लक्ष्मीबाई निरंजन इंगळे यांना मदत देण्यात आली. तसेच उद्योग उभारणी योजनेतंर्गत जनरल स्टोअर्ससाठी  मिना बोचरे    स्टॅम्प विक्रेता सुनिल  खेडकर यांना  आणि दिव्यांग अव्यंग विहित  जोडप्यांना  प्रोत्साहन अनुदान अंतर्गत रविता दशरथ दांडगे व  राजेश मोतीराम चवरे तसेच  शेख नासीर शेख अब्द्दुला  व हिना कासम शेख नासीर यांना  बचत प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. 
तत्पुर्वी  महाराष्ट्र राज्य अपंग (दिव्यांग) कर्मचारी / अधिकारी व दिव्यांग बेरोजगार संघटनेतर्फे ना. बच्चू कडु यांची  लेटर बुक  तुला करण्यात आली. यावेळी  संघटनेचे अध्यक्ष संजय बरडे व सचिव मो.अ. अजीज उपस्थितित होते.  याठिकाणी इंद्रायणी मंद मुलांची शाळा व सेंट  ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या स्टॉलला ना. कडु यांनी भेट दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  मुख्य कार्यकारी अधिकारी  आयुष प्रसाद यांनी  केले.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता  डॉ. घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत  आकोत  यांनी तर उपस्थितांचे आभार  जिल्हा समाज कल्याण अधिकारी  रामेश्वर वसतकार  यांनी केले. या  कार्यक्रमाला मोठ्या संख्येने  दिव्यांग बांधव उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ