शिवभोजन केंद्राचा शुभारंभ: सेवेतून निर्माण होणारे नाते हे रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ -पालकमंत्री ना. बच्चू कडू


जिल्हा रुग्णालय व कृषि उत्पन्न बाजार समिती येथील केंद्र कार्यान्वित
अकोला,दि.२६(जिमाका)- समाजातील व्यक्तिंनी, संस्थांनी अन्नदानाच्या, मेजवान्यांच्या प्रसंगी शिवभोजन योजनेसाठी काही हिस्सा काढून ठेवावा व आपले योगदान द्यावे. जात धर्म पंथ असा कोणताही भेदभाव न करता केवळ सेवा म्हणून ही योजना राबविण्यात यावी. सेवेतून निर्माण होणारे नाते हे रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असते,असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र विकास, महिला बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, महिला बालविकास, शालेय शिक्षण कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश  उर्फ बच्चू डू यांनी आज येथे केले.
            शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या शिव भोजन योजनेचा आज प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज येथे कृषि उत्पन्न बाजार समिती व जिल्हा रुग्णालयात शिवभोजन केंद्राचा शुभारंभ ना. बच्चू कडू  यांच्या हस्ते करण्यात आला.  
            यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या शिव भोजन केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,  मनपा आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे, भोजन केंद्र चालक वत्सलाताई टाले इ. मान्यवर  उपस्थित होते.
            तसेच जिल्हा  सामान्य रुग्णालयातील भोजन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी या मान्यवरांसोबत विधान परिषद सदस्य आ. गोपिकिशन बाजोरीया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, केंद्र चालक गणेश नानोटी आदी उपस्थित होते.
            यावेळी ना. बच्चू कडू म्हणाले की, शिव भोजन योजना ही गोरगरिबांना माफक दरात भोजन उपलब्ध करुन देणारी योजना आहे. कुणीही भुकेले राहू नये यासाठी शासन पुढे आले आहे ही अत्यंत समाधानाची बाब आहे, मात्र असे असतांना समाजानेही या योजनेत आपले योगदान द्यावे, म्हणजे कुणावरही उपाशी ,अर्धपोटी राहण्याची वेळ येणार नाही, असे आवाहन त्यांनी केले. गोरगरिबांना स्वाभिमानाने भोजन देणारी ही योजना  असून या योजनेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे जेणेकरुन गरजूंना भोजन मिळेल. समाजातील लोकांनी आपल्या घरच्या मंगल प्रसंगी वा अन्य निमित्ताने  होत असलेल्या अन्नदानाच्या, मेजवान्यांच्या प्रसंगी या योजनेसाठी काही हिस्सा काढून ठेवावा व आपले योगदान द्यावे,असे आवाहन त्यांनी केले.  जात धर्म पंथ असा कोणताही भेदभाव न करता केवळ सेवा म्हणून ही योजना राबविण्यात यावी. सेवेतून निर्माण होणारे नाते हे रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असते, असे त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी आ. गोपिकिशन बाजोरिया यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांनी केले.
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अनंत खेळकर, योगेश अग्रवाल यांनी केले.  या योजनेनुसार शिव भोजन थाळीत ३० ग्रॅमच्या दोन चपात्या,  १०० ग्रॅम एक वाटी भाजी, १५० ग्रॅम एक मूद भात, १०० ग्रॅम एक वाटी वरण देण्यात येणार आहे. ही भोजन थाळी १० रुपयांमध्ये उपलब्ध होणार असून ही थाळी  दुपारी १२ ते दोन यावेळात उपलब्ध असेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ