महिला आणि सायबर सुरक्षा मेंदू,मनगट आणि 'फिंगर टिप' वरच अवलंबून आहे सायबर सुरक्षा सायबर तज्ञ मोहिनी मोडक यांचे प्रतिपादन







अकोला,दि.3 (जिमाका)- सायबर  विश्वात  वावरतांना महिलांनी आपल्या मेंदू, मनगट आणि ज्या द्वारे एक क्लिक केली जाते ते बोट अर्थात फिंगर टिप यांचा योग्य व सजग वापर करणे यावरच महिलांची सायबर  सुरक्षा अवलंबून आहे, असे प्रतिपादन सायबर तज्ञ श्रीमती मोहिनी मोडक यांनी आज येथे केले. येथील जिल्हा माहिती कार्यालय व सायबर सेलच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात 'महिला व सायबर सुरक्षा' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सायबर सेलचे उपनिरीक्षक शैलेंद्र ठाकरे,जेष्ठ पत्रकार शौकतअली मिरसाहेब यांची उपस्थिती होती.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. तसेच या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा व्हिडीओ संदेशही दाखवण्यात आला.
आपल्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले की, महिलांच्या सायबर सुरक्षेबाबत सजगता निर्माण करणे हा या कार्यशाळेचा उद्देश असून या कार्यशाळेतून मिळणारे मार्गदर्शन सहभागी प्रत्येक महिलांनी बाहेर आपल्या संपर्कातील महिलांपर्यंत पोहोचविले तर खऱ्या अर्थाने जनजागृती होईल.
आपल्या सादरीकरणात कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शिका, स्तंभलेखिका, होरायझन वेब टेक्नॉलॉजीच्या मोहिनी मोडक म्हणाल्या की,आजच्या युगात महिला व सायबर सुरक्षा सुरक्षितता महत्वाची आहे. ही बाब तीन गोष्टीवर अवलंबुन असते ज्यामध्ये परिस्थिती, मानसिक कणखरता,समजता सजगता महत्त्वाची आहे. यावेळी त्यांनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतांना घ्यावयाची खबरदारी याविषयावर उदाहरणांसह माहिती दिली. आज मोबाईल व इंटरनेटचा वापर करणारी स्त्री खरीखुरी आधुनिक सावित्री आहे. सायबर युगात वावरणे आवश्यक आहे, मात्र योग्य खबरदारी घेतल्यास त्यात कोणताही धोका नाही,असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी डॉ मिलिंद दुसाने यांनी तर सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन विशाल बोरे यांनी केले.
या कार्यशाळेला प्रिंट,इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला अधिकारी कर्मचारी व अन्य महिलांची उपस्थिती होती.कार्यशाळा यशस्वीततेसाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे नितीनकुमार डोंगरे, चंद्रकांत पाटील, वर्षा मसने, सतीश बगमारे,हबीब शेख, किसनराव कडू, सुनील टोमे यांनी परिश्रम घेतले.
                                 00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ