निर्णय प्रक्रियेत स्त्रियांना संधी दिल्यास होतात सकारात्मक बदल - महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे


अकोला, दि. ११ (जिमाका)- जिथे जिथे स्त्रियांना निर्णय प्रक्रियेत संधी मिळून सहभाग वाढला तिथं तिथं सकारात्मक बदल होतात, त्यामुळे स्त्रियांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी आज येथे केले.
येथील भारतीय सेवा सदन संचलित श्रीमती राधादेवी गोएंका महिला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाविद्यालयात रेडिओ कॉटन सिटी च्या रेडिओ समुपदेशन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच श्रीमती राधादेवी गोएंका स्टुडंन्ट ऑफ दि इयर हा पुरस्कार दिव्या राजेश चौहान या विद्यार्थिनीला डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यास विधान परिषद सदस्य तसेच भारतीय सेवा सदन अकोलाचे उपाध्यक्ष आ. गोपीकिशन बाजोरिया, संस्थेचे अध्यक्ष दिलीपराज गोएंका, उपाध्यक्ष रविंद्रकुमार गोएंका,सचिव आलोककुमार गोएंका, प्रा. ललित भट्टी, प्राचार्य डॉ. देवेंद्र व्यास, रेडिओ कॉटन सिटीचे डॉ. गणेश बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागतपर कथक नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीपराज गोएंका यांनी केले. यावेळी स्त्री केंद्राच्या अपूर्वा गोंधळेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. देवेंद्र व्यास यांनी अहवाल वाचन केले. आ. गोपीकिशन बाजोरिया यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आपल्या मार्गदर्शनात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, जात, लिंग भेद, वर्ण ,आर्थिक स्थिती यावरून अनेक संधी वगळण्याचे प्रयत्न अनुभवास येतात. जगात अनेक बदल घडतायेत. सामाजिक सुधारणांमुळे आज स्त्रिया विविध पदांची जबाबदारी सांभाळतायेत. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर,महर्षि कर्वे यांच्यासारखे समाजसुधारक नसते तर आज आपण कुठे असतो? याचा विचार सर्व मुलींनी करावा,असे आवाहन त्यांनी केले.
त्या पुढे म्हणाल्या की, मुलींनी कायदे साक्षरतेचा तसेच शाश्वत विकासाच्या योजनांबाबत अभ्यास करावा. आयुष्यात कधी निराशा आली तर मैत्रिणी या एकमेकींचे अधिक चांगल्या पद्धतीने समुपदेशन करू शकतात, मुलींनी एकमेकींची उमेद वाढविण्यासाठी प्रयत्न करावे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राधा स्वाजियानी, डॉ. शालिनी बंग यांनी केले तर प्रा. ललित भट्टी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे संचालक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थिनी तसेच पालकवृंद उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ