कोवीडमुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स : बालकांच्या पुनवर्सनासाठी बाल कल्याण समितीकडे संपर्क साधा

 




अकोला, दि.१८ (जिमाका)- कोवीड -१९ महामारीमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे पालनपोषण, यथायोग्य संरक्षण व संगोपनाच्या  दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशा बालकांचा पुनर्वसनासाठी शोध घेऊन बाल कल्याण समितीकडे किंवा संबंधित तहसिलदार, गटविकास अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे माहिती देण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी नितीन खंडागळे यांनी केले.

अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात बालकांच्या काळजी व संरक्षणाकरीता कृती दलाची बैठक आयोजीत करण्यात आली. यावेळी महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष सौ. पल्लवी कुळकर्णी,  मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदस्य सचिव राजेश देशमुख, चाईल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजभिये, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. सुनिल मानकर,  जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, संगिता ठाकुर, सुनिल सरकटे आदी उपस्थित होते.

सद्यस्थितीत कोरोनाचा विषाणूचा वाढलेला संसर्ग आणि त्यामुळे कोवीड-१९ बाधीत व्यक्तींचे व मृत्युचे वाढलेले प्रमाण विचारात घेता, त्याचा बालकांच्या जीवनावर परिणाम होत आहे.  त्यात काही बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत. या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची शक्यता असते  तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करी सारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता असते. बालकांचे शोषण होवू नये व त्यांचे संरक्षण व पालनपोषण व्हावे याकरीता अधिनियमान्वये कृती दल गठीत करण्यात आले आहे. या कृती दलामार्फत पालक गमावलेल्या बालकांचे पालनपोषण व संरक्षण करण्यात येणार आहे.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मरसाळे यांनी याबाबत माहिती दिली की, आई किंवा वडील तसेच दोघांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यास किंवा कोरोनाची लागण झाली असल्यास अशा १८ वर्षाखालील बालकांची तात्पुरत्या व दीर्घकाळ स्वरुपाचे पुर्नवसनासाठी बाल कल्याण समितीकडे दाखल करावे. जेणे करुन अशा बालकांना बालगृहांमध्ये पुर्नवसन करण्यात येईल. जिल्हा व तालुकास्तरावर अशी बालके आढळुन आल्यास तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील यांचेशी संपर्क साधावा. किंवा  बालकांचे  हितचिंतक या नात्याने चाईल्ड हेल्प लाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर किंवा बालकल्याण समितीच्या अध्यक्ष सौ.पल्लवी कुळकर्णी (९७६३२८८८७०), संरक्षण अधिकारी सुनिल लाडुलकर (८७६७७३१०७८),  चाईल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजभिये(९१४६६४४३५८), जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर (९४२१४६४५६६) यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,  असे आवाहन  जिल्हा महिला बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी  केले.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ