५९० जादा खाटा, ऑक्सिजन उपलब्धतेचे प्रशासनाचे नियोजन; बालकांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

            अकोला,दि. २० (जिमाका)- कोविड १९ च्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, जिल्ह्यात रुग्णांच्या उपचारासाठी सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यात  ५९० जादा खाटा, वाढीव ऑक्सिजन उपलब्धता तसेच औषधे व मनुष्यबळ उपलब्धता या सोबतच लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड वार्ड बाबतही नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे.

कोविड १९ च्या अनुषंगाने तिसऱ्या संसर्ग लाटेचे अनुमान विविध आरोग्य संस्थांकडून वर्तविण्यात येत आहे.  त्यादृष्टिने जिल्हा प्रशासन सज्ज असून प्रशासनाने याबाबत उपचार सुविधांचे नियोजन केले आहे.

वाढीव खाटांचे नियोजन

 जिल्ह्यात सध्या  शासकीय रुग्णालयांमध्ये  ६४० खाटा तर खाजगी रुग्णालयांत ७६७ खाटा  अशा एकूण १४०७ खाटांची उपलब्धता आहे.  वाढत्या रुग्ण संख्येचे अनुमान लक्षात घेता  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात २०० खाटांचे जम्बो कोविड रुग्णालय तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल  मध्ये २०० खाटांचे नियोजन असून त्यात ६० खाटा या केवळ लहान बालकां साठी राखीव असतील. याच ठिकाणी २० खाटांचा अतिदक्षता विभाग व ४० खाटांचा ऑक्सिजन पुरवठ्याची सुविधा आहे. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६० खाटा अतिरिक्त तयार करण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यात २० याप्रमाणे बाळापूर, तेल्हारा, अकोट, बार्शी टाकळी याप्रमाणे एकूण ८० खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. तर पातुर येथील आयुर्वेद महाविद्यालयात ५०  असे तालुकास्तरावर एकूण १३० खाटांचे नियोजज असून एकूण ५९० खाटांची वाढ नियोजित आहे.

ऑक्सिजन निर्मिती क्षमतेतही वाढ

 जिल्ह्यात सद्यस्थितीत  ७३ मेट्रिक टन इतकी ऑक्सिजन साठवण क्षमता आहे. त्यात वाढ करण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  १० मेट्रिक टन क्षमतेचा अतिरीक्त ऑक्सिजन टॅंक बसविण्यात येत आहे.  सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये १० मेट्रिक टन क्षमतेचा टॅंक तर  हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचे संयंत्र (पीएसए प्लॅंट) बसविण्याचेही नियोजन आहे. महाजेनकोच्या पारस येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या ऑक्सिजन निर्मितीचा प्लॅंट  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापित होईल. तर बाळापूर, अकोट, तेल्हारा, बार्शी टाकळी, पातूर तसेच  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालय येथेही पीएसए प्लॅंट बसविण्यात येणार आहे.

औषधींची उपलब्धता

 राज्य टास्क फोर्सने जारी केलेल्या निर्देशांप्रमाणे  कोविड रुग्णांवर करावयाच्या उपचार कार्यपद्धतीनुसार सर्व कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालये येथे  उपलब्ध खाटांची संख्या विचारात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली औषधींचे वितरण होत आहे. लहान मुलांसाठी द्यावयाच्या औषधांचीही  उपलब्धता करण्यात  आली आहे.

आवश्यक मनुष्यबळ

 वाढीव खाटांची संख्या निहाय रुग्णांच्या उपचार व देखभालीसाठी लागणारे मनुष्यबळ  कंत्राटी पद्धतीने  आरोग्य विभागाकडून उपलब्ध करण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत  मनुष्यबळाची  उपलब्धता करण्याचे नियोजन हे जिल्हा शल्य चिकित्सकांकडे देण्यात आले आहे.

लहान मुलांसाठी विशेष कक्ष

 लहान बालकांसाठी  सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे  स्वतंत्र वार्ड तयार करण्यात येत आहे. त्यात लहान मुलांसाठी २० खाटांचा अतिदक्षता विभाग तसेच ऑक्सिजन पुरवठ्याची सोय असलेले ४० असे ६० खाटांचा सुसज्ज कक्ष असेल. तसेच लहान मुलांचे तज्ज्ञ डॉक्टर्सही  नियुक्त करुन डॉक्टरांचा एक टास्क फोर्स तयार करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :