कोविड -१९ आढावा सभा :नियमांचे पालन होत नसल्यास गृह अलगीकरणाऐवजी संस्थात्मक अलगीकरण-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 





    अकोला,दि.२२(जिमाका)- जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांकडून नियमांचे पालन होत नसल्यास आता गृह अलगीकरणात रूग्णांना ठेवण्याची पद्धत बंद करावी व प्रत्येक गावात संस्थात्मक अलगीकरणात रुग्णांना ठेवून उपचार देण्यास सुरवात करा,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

ग्रामीण भागातील वाढता कोरोना संसर्ग पाहता आज जिल्हा नियोजन भवनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.यावेळी तालुका व गावनिहाय आढावा घेण्यात आला.

यावेळी निर्देश देण्यात आले की, उपविभाग, तालुका आणि गावपातळीवर सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी दररोज तालुकास्तरावर बैठका घेऊन आढावा घ्यावा व दररोजच्या कामाचे नियोजन करावे. प्रत्येक गावात होत असलेल्या विवाह समारंभावर लक्ष ठेवून जादा संख्या असल्यास कारवाई करावी. प्रत्यक्ष गावातील जबाबदारी ही स्थानिक ग्रामपंचायतीची जबाबदारी असून अन्य यंत्रणा त्यांना मदतीसाठी उपलब्ध असतील. बहुतेक ठिकाणी गृह अलगीकरणामधील रुग्ण जर कोविड नियमांचे पालन करत नसतील तर अशा लोकांना संस्थात्मक अलगीकरणात आणून उपचार करा. याबाबत गावातील लोकांकडून प्रतिसाद नसल्यास त्या त्या गावातच संस्थात्मक अलगीकरणाची सुविधा तयार करून लोकांना सक्तीने तेथे उपचारासाठी न्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. निर्बंधांमधून सूट दिलेल्या सकाळच्या  कालावधीत सुद्धा सोशल डिस्टनसिंगचे पालन होत नसल्यास त्या क्षणी कारवाई करावी,असेही निर्देश देण्यात आले. कृषी सेवा केंद्र व बँकांमधील गर्दीचेही नियमन करावे,अशा सुचना देण्यात आल्या. यावेळी गावातील चाचण्या, लसीकरण, प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन व अंमलबजावणी, मृत्यू संख्या,प्रतिबंधित गावामधील सद्यस्थिती इ. बाबत आढावा घेण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ