अनाथ बालकांचे परस्पर दत्तक विधान बेकायदेशीर; गैरप्रकारांबाबत तात्काळ माहिती द्या -महिला व बालविकास विभागाचे आवाहन

 अकोला, दि.६(जिमाका)- कोविड १९ च्या महामारीच्या काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या दत्तक देवाण घेवाण बाबत विविध समाजमाध्यमांवर पोस्ट प्रसिद्ध केल्या जात आहेत. अशा कोणत्याही समाजमाध्यमांद्वारे बालकांचे दत्तक विधान प्रक्रिया होत नाही. अशा प्रकारात समाजकंटकांचा सहभाग असू शकतो व त्यातून बालकांची अवैध विक्री इ. प्रकाराचा धोका असू शकतो. समाजातील जागरुक नागरिकांनी याबाबत तात्काळ महिला व बालविकास अधिकारी तसेच पोलीस विभागाला माहिती द्यावी.

तसेच अशाप्रकारे अनाथ झालेल्या बालकांबाबत तसेच अशा बालकांना दत्तक घेऊ इच्छिणारे  पालकांसाठी  www.cara.nic.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे,असे आवाहन  महिला व बालविकास अधिकारी  विलास मरसाळे यांनी केले आहे. असे प्रकार निदर्शनास आल्यास महाराष्ट्राच्या सारा (State Adaptation Resource Agency)  संस्थेच्या ८३२९०४१५३१ या क्रमांकावर माहिती द्यावी. बालकांना परस्पर दत्तक घेणे वा देणे , बालकांची खरेदी विक्री करणे हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा असून भारतीय दंड संहिता १८६० बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ तसेच दत्तक नियमावली २०१७ नुसार कठोर कारवाई केली जाते. कायदेशीर दत्तक  घेण्यासाठी www.cara.nic.in या संकेतस्थळावर माहिती व ऑनलाईन अर्ज करण्याची  सुविधा आहे.  अकोला जिल्ह्यात अशाप्रकारे अनाथ झालेली बालके आढळून आल्यास  १०९८ या चाईल्ड हेल्पलाईन या टोल फ्री क्रमांकावर  संपर्क साधावा किंवा स्थानिक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बालसंरक्षण कक्ष, पोलीस विभाग,  बालकल्याण समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :