फरमर्दाबाद येथील काळविट शिकार प्रकरणी संशयितांना वनकोठडी; आलेगाव शिवारात १४ रानडुकरांची विहीरीतून सुटका





 अकोला, दि.१७ (जिमाका)- अकोला प्रादेशिक वनविभागाअंतर्गत बाळापुर तालुक्यातील फरमर्दाबाद शिवारात रविवार दि.१६ रोजी झालेल्या काळविट शिकार प्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना न्यायालयाणे वनकोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आलेगाव शिवारात एका विहिरीत पडलेल्या १६ रानडुकरांपैकी १४ रानडुकरांची सुरक्षित सुटका करण्यात वनविभागाच्या पथकास यश मिळाले असल्याची माहिती उपवनसंरक्षक के. आर. अर्जूना यांनी दिली आहे.

या संदर्भात वनविभागाकडून प्राप्त माहितीनुसार, रविवार दि.१६ रोजी अकोला प्रादेशिक वनविभागाअंतर्गत बाळापुर तालुक्यातील फरमर्दाबाद  येथील शेत शिवारा मध्ये रात्री वन्यप्राण्यांची शिकार होत असल्याची गुप्त माहिती वन विभागास प्राप्त झाली. त्यानुसार अकोला वनविभागाचे वनपाल जी.डी इंगळे व वनरक्षक आर के बिडकर यांचे नेतृत्वात वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.वनकर्मचाऱ्यांनी सुनियोजीत पद्धतीने शिकारी टोळीचा पाठलाग करुन पाच संशयित शिकाऱ्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांत अकोट तालुक्यातील जऊळखेड येथील जगदेव शहादेव बागडे, वय ३८, सागर इंदारे वय २४, संतोष गणेश इंदोरे, वय ३०, ईश्वर बाळकृष्ण इंदोरे वय २६ तसेच  बाळापुर तालुक्यातील फर्माबाद येथील पंकज भिमराव शिरसाट वय २१ यांचा समावेश आहे. या घटनेत अन्य दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या संशयितांनी गावठी बंदुकीच्या सहाय्याने एका काळविटाची शिकार केली  व अन्य एका काळविटाला बांधुन ठेवले होते. बांधुन ठेवलेल्या काळविटाला सकाळी  नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. संशयितांकडून घटनास्थळावरुन एक मृत काळविट, दोन धारदार शस्त्र, बंदुकीचे छर्रे, सुतळी फटाके, बारुद, माचिस, मोबाईल,  तीन मोटर सायकल इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. या संशयितांना अटक करुन न्यायालयात  हजर केले असता एका दिवसाची वनकोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास अकोला येथील उपवनसंरक्षक, अकोला के.आर अर्जुना व सहायक वनसंरक्षक वने सुरेश वडोदे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, अकोला आर एन ओवे करीत आहे.

तसेच रविवार दि. १६ रोजी आलेगांव वनपरिक्षेत्रातील आलेगाव वर्तुळातील आलेगांव नियतक्षेत्रातील मौजा आलेगांव शेत शिवारात गजानन लोभाजी उगले यांचे शेतातील विहीरीमध्ये सकाळी आठ वाजेच्या सुमारास वन्यप्राणी रानडुक्कर पडल्याने श्रीधर लाड यांनी दूरध्वनीवरुन माहिती दिली. माहिती मिळताच  उपवनसंरक्षक के.आर अर्जुना, सहायक वनसंरक्षक (वने) सुरेश वडोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी पातुर डी.डी. मदने यांच्या मार्गदर्शना खाली आलेगाव वनपरिक्षेत्रातील वन्यप्राणी रेस्क्यु पथक पाठवुन विहीरीत पडलेल्या १६ पैकी १४ रानडुकरांना यांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलेत्यांना आलेगांव नियतक्षेत्रातील कक्ष क्र  सी १६२ मध्ये सोडण्यात आले,उर्वरीत दोन रानडुककर हे  सुटका करतांना मृत आवस्थेत आढळुन आले. मृत रानडुकरांचा पंचनामा नोंदवुन त्यांचे मृतदेह जाळुन त्याची विल्लेवाट लावण्यात आली, अशी माहिती उपवनसंरक्षक के.आर. अर्जूना यांनी दिली आहे.

 

            वन्यजीवांची शिकार होत असल्यास १९२६ या वनविभागाच्या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क करुन माहिती द्यावी,असे आवाहन उपवनसंरक्षक के. आर. अर्जूना यांनी केले आहे.

पिंपळखुटा शिवारात मृतावस्थेत आढळलेल्या

पक्षांचे नमुने हैदराबाद येथील प्रयोगशाळेत रवाना

बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळखुटा गोरवा रस्त्यावरील शेताच्या बाजुस एका तलावा जवळ सहा मोर व सात लांडोर तसेच दोन चिमण्या व तीन टिटव्या मृत आवस्थेत आढळुन आले आहेत.

            घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक अर्जुना के.आर  व सहाय्यक वनसंरक्षक वने सुरेश वडोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी डांगे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.  तालुका पशुधन अधिकारी डॉ. वर्षा चोपडे, प्रभारी वनपाल पी.डी पाटील यांचा सहभाग होता. मृत्युमुखी पडलेल्या पक्षांची शिकार झाली कि अज्ञा आजाराने त्यांचा मृत्यु झाला याचा उलगडा अद्याप झाला नसुन. मृत पक्षांचे शवविच्छेदन करण्या करीता  ते फॉरेन्सीक लॅब हैदराबाद येथे पाठविण्यात आले आहे.  या घटनास्थळावर गहु आढळुन आले असुन त्याचे सुद्धा नमुने तपासणी करीता पाठविण्यात आले आहे,असे उपवनसंरक्षक के.आर. अर्जूना यांनी कळविले आहे.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ