मान्सुन २०२१ पुर्व आढावा बैठक :कोविडच्या पार्श्वभुमिवर गावपातळीवरील यंत्रणांनी सज्ज रहावे- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश
अकोला,दि. १८ (जिमाका)- आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून मान्सूनपूर्व तयार करत असतांना यंदा या आपत्ती व्यवस्थापनाला कोविड संसर्गाची पार्श्वभूमी आहे. त्यादृष्टीने गाव ते जिल्हा मुख्यालय स्तरावरील सर्व संबंधित यंत्रणांनी पूर्वतयारी करुन अधिक सतर्कतेने सज्ज रहावे,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.
जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन दलाची मान्सून पूर्व तयारीची आढावा बैठक आज ऑनलाईन पद्धतीने
घेण्यात आली. या बैठकीस मुख्यालयातून
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी
संजय खडसे हे सहभागी झाले. तर ऑनलाईन पद्धतीने जिल्हाभरातून सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिका मुख्याधिकारी,
वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे विभाग, आरोग्य विभाग इ. सर्व विभागांचे
महत्त्वाचे अधिकारी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी पापळकर यांनी सहभागी अधिकाऱ्यांशी
संवाद साधतांना सांगितले की, यंदाची मान्सूनपूर्व तयारी करत असतांना कोविड संसर्गाच्या
स्थितीचे भान राखून आपल्याला तयारी करावयाची आहे.
आगामी काळात कोरोना संसर्ग फैलावणार नाही याबाबतच्या उपाययोजना कायम राखून
आपत्ती व्यवस्थापनाची तयारी करावयाची आहे. त्यासाठी कोणत्याही कोविड रुग्णालयाचा वीज
पुरवठा खंडीत होऊन उपचार सुविधेत बाधा निर्माण होणार नाही, याची दक्षता वीज वितरण
कंपनीने घ्यावयाची आहे. त्याचप्रमाणे ऑक्सिजन रिफिलिंग प्लांटचे कामही अव्याहतपणे
सुरु राहिल, यासाठी वीज पुरवठा सुस्थापित करावा.
सर्व जुने, नवे पूल यांची तपासणी करुन घ्यावी. पाटबंधारे विभागाने
सर्व लहान मोठ्या प्रकल्पांच्या स्थितीची प्रत्यक्ष तपासणी करुन अहवाल सादर करावा.
पूर व्यवस्थापनासाठी नदी काठावरील तसेच पूरप्रवण गावांमध्ये संपर्क यंत्रणा व
खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. पुरामुळे काठावरील रहिवाशांना
स्थलांतरीत करावयाची वेळ आल्यास त्यांच्या पक्क्या निवाऱ्याची पर्यायी जागा, तेथे
त्यांना द्यावयाचे भोजन, आवश्यक वैद्यकीय सुविधा, औषधांची उपलब्धता आदींचा साठा व
पुर्वतयारी करणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाने पावसाळ्यात उदयास येणाऱ्या विविध साथींच्या आजारांच्या उपचारासाठी वैद्यकीय सुविधांचा ॲक्शन प्लॅन तयार करावा.
त्यासाठी आवश्यक त्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे. शहरी भागात व मनपा हद्दीत
नाले सफाईची कामे तातडीने पूर्ण करुन कुठेही पाणी तुंबणार नाही याची खातरजमा
करावी. नदी पात्र वा नाल्यात अतिक्रमणे केलेल्या लोकांना तातडीने अतिक्रमणे हटवून
तेथून सुरक्षित ठिकाणी हलवावे. आपत्ती निवारणासाठी पुरविण्यात आलेल्या साहित्याचे
शोध व बचाव पथकाच्य्या शीघ्र कृतीदलाच्या सदस्यांना वाटप करावे. ते साहित्य
संभाव्य आपत्तीच्या स्थळी वेळीच पोहोच करावे.
या काळात सर्व शासकीय यंत्रणांची संपर्क
यंत्रणा सुसज्ज असली पाहिजे. त्यावरुन
वेळचेवेळी संदेश व आवश्यक माहितीची देवाण घेवाण झाली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक
तालुकास्तरावर असणाऱ्या नियंत्रण कक्षाचे येत्या दि.१ जून पासून २४X७ कार्यान्वयीत असणे आवश्यक आहे. जिल्हा मुख्यालयाच्या संपर्कात नसणे हा एक
गंभीर गुन्हा मानला जाईल,असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा