प्रारंभिक अवस्थेतच रुग्ण शोधण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा - जिल्हाधिकारी पापळकर यांचा ग्रामीण भागातील डॉक्टर्सशी ऑनलाईन संवाद

 



    अकोला,दि.२(जिमाका)- कोविड १९ च्या उपचारामध्ये प्रारंभिक अवस्थेत संसर्ग लक्षात येणे व लवकरात लवकर उपचार सुरु होणे हा महत्त्वाचा भाग आहे, यामुळे आपण रुग्णांना गंभीर होण्यापासून तसेच मृत्यूपासुनही वाचवू शकतो, तरी ग्रामीण भागात आपली सेवा देणाऱ्या सर्व जनरल फिजिशियन्सने  कोरोना संसर्गाच्या प्रारंभिक अवस्थेतच रुग्ण शोधण्यास प्रशासनाला सहकार्य करावे, असे  आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.

ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता फैलाव तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका व म्युकरमायकोसिस या आजाराची वाढत असलेली रुग्णसंख्या याबाबत  आज जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णसेवा देणाऱ्या खाजगी जनरल फिजिशियन डॉक्टर्सशी जिल्हा प्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, जिल्हा शल्य चिकित्सक तथा उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले तसेच सर्व तालुक्यातील डॉक्टर्स  ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.

            आज दिवसभरात  मुर्तिजापूर, बाळापूर,  अकोट, तेल्हारा, पातूर, बार्शी टाकळी व अकोला या तालुक्यातील  डॉक्टर्सशी संवाद साधण्यात आला. यावेळी डॉ. राजकुमार चव्हाण तसेच डॉ. सुरेश आसोले यांनी डॉक्टर्सना कोविड संदर्भात वापरावयाची उपचार पद्धती व उपचार अनुक्रमता याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, आपण ज्या भागात आपली सेवा देता त्या भागाला- गावाला कोरोनामुक्त करणे हे आपले कर्तव्य असून त्यासाठी आपण प्रशासनाला सहकार्य करावे. आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना प्रारंभिक अवस्थेतच चाचणीसाठी प्रवृत्त करावे. पेशंटचा अहवाल कोविड निगेटीव्ह असल्यास त्यावर पुढील उपचार करावे अन्यथा त्यास शासकीय यंत्रणेच्या दवाखान्यात पाठवावे. आपल्याकडे येणाऱ्या कोविड संशयित रुग्णांची एक यादीही आपण स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे अथवा आरोग्य यंत्रणेकडे देऊ शकता. त्याव्यक्तींचा स्थानिक पातळीवर पाठपुरावा करता येईल. या लवकर चाचणी व लवकर उपचार या पद्धतीचा अवलंब हा केवळ संसर्ग रोखण्यासाठी आहे.

ग्रामीसण भागात आता बरेच लोक जे कोविडचे उपचार घेऊन बरे होऊन परत गेले आहेत अशा लोकांवरही आपण स्थानिक पातळीवर म्युकर मायकोसिसच्या संसर्गाबाबत  लक्ष ठेवावे, त्यांना याबाबत समजावून सांगावे. त्यासोबतच तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका व त्यात लहान बालकांना होणाऱ्या संसर्गाचा धोका वर्तवण्यात आल्याने बालकांच्या आरोग्याकडेही आपण लक्ष द्यावे, त्यांच्या तपासण्या व लक्षणांतील बदल प्रशासनास तात्काळ कळवावे,असे आवाहन  जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ