सामाजिक न्याय दिन; राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिनी विविध उपक्रम









अकोला,दि.२६(जिमाका)- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांनी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला. समता दिंडी, लाभार्थ्यांना योजना लाभांचे प्रमाणपत्र वितरण, व्याख्याने असे विविध उपक्रम राबविण्यात आले.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे मुख्य सोहळा कार्यक्रम राधाकिसन लक्ष्मीनारायण तोष्णीवाल महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त अमोल यावलीकर, महात्मा फुले विकास महामंडळाचे यावलीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.डी. नानवटी, विशेष अधिकारी प्रदीप सुसतकर, डॉ. धर्मपाल चिंचोलकर, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे खंडारे, जिल्हा समाजकल्याण विभागाचे प्रतिनिधी पी.डी. हाडोले आदी मान्यवर उपस्थित होते.

 कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करुन राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. महात्मा फुले विकास महामंडळातर्गंत पात्र लाभार्थ्यांना कर्ज लाभांचे प्रमाणपत्र तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. शाहीर खंडुजी शिरसाट यांच्या कलापथकाने छत्रपती शाहू महाराजांचा पोवाडा व जनजागृतीपर गिते सादर केले. तर शाहीर मधुकर नावकार यांनी नशा मुक्त भारत पंधरवाडा अभियानातर्गंत व्यसनमुक्ती गीताव्दारे जनजागृती केली. तसेच उपस्थितांना व्यसनमुक्त राहण्याबाबत शपथ दिली. 

महात्मा जोतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांची आज देशाला खऱ्या अर्थाने गरज आहे. या महामानवाचा विचारांचा वारसा प्रत्येकांनी आत्मसात करावा. तसेच छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या जीवनकाळात राबविलेल्या विविध योजना ह्याच आजच्या सामाजिक न्यायाच्या योजनांचा आधार असल्याचे प्रतिपादन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त अमोल यावलीकर यांनी केले.

व्याख्यानात डॉ. धर्मपाल चिंचोलकर यांनी शाहू महाराजांच्या कार्याची थोरवी सांगितली. महात्मा जोतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुरोगामी विचार हे देशाला व देशातील प्रत्येक लहान लहान घटकाला पुढे नेऊ शकतात. महामानवांच्या त्याग आणि संघर्षामुळे आज आपण सारे स्वतंत्रपणे जगू शकतो, याची जाण प्रत्येकाने ठेवायला हवी. शाहू महाराजांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून समाजजागृती केली. सर्व प्रथम मागासवर्गाना आरक्षण देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. डॉ. चिंचोलकर यांनी शाहू महाराजांच्या जीवनातील प्रसंगांचे उदाहारणाव्दारे वर्णन करुन त्यांचे कार्य उपस्थितांना सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप सुसतकर यांनी केले. सूत्रसंचालन विजय बेदरकर यांनी तर आभारप्रदर्शन उज्वल भटकर यांनी केले. यावेळी समाजकल्याण विभाग, जिल्हा जात पडताळणी विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच एलआरटी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक न्याय दिनी आज सकाळी साडेआठ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयापासून समता दिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे समाजकल्याणचे विशेष अधिकारी प्रदीप सुसतकर, अधीक्षक रेखा ठाकरे तसेच विविध अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरु होवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-अशोक वाटिका मार्गाने ही दिंडी मार्गस्थ झाली.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ