‘शासन आपल्या दारी’:मुर्तिजापूर येथे 1634 लाभार्थ्यांना मिळाला लाभ











अकोला, दि.20(जिमाका)-   शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत आज मुर्तिजापूर येथे आयोजित शिबिरात 1634 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला, असे तहसिलदार शिल्पा बोबडे यांनी कळविले आहे.

            मुर्तिजापूर तहसिल कार्यालयाव्दारे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आ. हरिष पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती देवाशिष भास्कर, पंचायत समिती सदस्य दादाराव किरदत, उपविभागीय अधिकारी संदीप अपार, तहसिलदार शिल्पा बोबडे, मुख्यधिकारी सुप्रिया टवलारे, आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे, गटविकास अधिकारी अशोक बागर, नायब तहसिलदार उमेश बनसोड, तालुका कृषी अधिकारी अमृता काळे, तसेच विविध विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

आ. पिंपळे म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमामुळे सर्व विभाग एकत्रितरित्या एकाच ठिकाणी जनतेसाठी उपलब्ध असून जनतेची सर्व कामे एकाच ठिकाणी होत आहे. यामुळे जनतेचा पैसा व वेळ वाचून कामांना गती मिळत आहे. शासनाच्या विविध योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळेल याकरिता प्रशासनाने तत्परतेने काम करावे. सामान्य नागरिकांचे समस्यांचे निराकरण व लोकसेवेसाठी शासन व प्रशासन नेहमीच तत्पर आहे. सर्व विभागाने समन्वय साधून लोकांचे प्रश्न मार्गी लावावे. लोकांकडून आलेल्या सर्व अर्जांचा निपटारा करावे,अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाथार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचावावे, असे आवाहन आमदार हरिश पिंपळे यांनी केले 

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचे लाभ पात्र लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. त्यात महिला बालविकास विभाग, कृषी विभाग, सामाजिक न्याय विभाग, महसूल , ग्रामविकास, आरोग्य, आदिवासी विकास विभाग, उद्योग विभाग, भारतीय स्टेट बॅंक, जिल्हा बॅंक अशा विविध विभागांच्या योजनांच्या लाभांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व विभागांनी आपापल्या विभागांच्या योजनांची माहिती देण्यासाठी व लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी स्टॉल्स लावले होते. त्यात आयुष्यमान भारत योजनेतर्गंत गोल्डन कार्ड वितरण, बचत गटाना कर्ज वितरण, फेरफार नोंदी, शेतरस्त्याचे सामंजस्याने सोडविण्यात आलेल्या प्रकरणातील आदेश, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमीलेयर दाखले,  अधिवास, रहिवास दाखले, जॉब कार्ड वाटप, अंत्योदय रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे आदेश, अनाथ बालकांचे प्रमाणपत्र,  कृषी विभागामार्फत ट्रॅक्टर,  आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना बि-बियाणे वाटप असे विविध लाभ देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांनी केले. सुत्रसंचालन चैताली यादव यांनी तर  आभार प्रदर्शन तहसिलदार शिल्पा बोबडे यांनी केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ