शासन आपल्या दारी:बार्शी टाकळी येथे दीड हजार लाभार्थ्यांना मिळाला लाभ

















 अकोला, दि.१६(जिमाका)- शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी ‘शासन आपल्या दारी’, हे अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत आज बार्शीटाकळी येथे  आयोजित  शिबिरात दीड हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला,असे तहसिलदार दीपक बाजड यांनी कळविले आहे.

आ. हरिष पिंपळे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. पंचायत समिती सभापती सुनंदा मानतकर,उपसभापती संदीप चौधरी, नगराध्यक्ष मेहबुब खा रसूल खान, जिल्हा परिषद सदस्य गोपाल  भटकर, उपविभागीय अधिकारी संदीप अपार, तहसिलदार दीपक बाजड, तालुका कृषी अधिकारी विलास वाशिमकर, आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे तसेच विविध विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

राज्यगीत होऊन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचे पात्र लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. त्यात महिला बालविकास विभाग, कृषी विभाग, सामाजिक न्याय विभाग, महसूल , ग्रामविकास, आरोग्य,आदिवासी विकास विभाग, उद्योग विभाग, पोलीस विभाग, भारतीय स्टेट बॅंक, जिल्हा बॅंक अशा विविध विभागांच्या योजनांच्या लाभांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व विभागांनी आपापल्या विभागांच्या योजनांची माहिती देण्यासाठी व लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी स्टॉल्स लावले होते. त्यात लोकांना ७/१२, फेरफार नोंदी, शेतरस्त्याचे सामंजस्याने सोडविण्यात आलेल्या प्रकरणातील आदेश, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमीलेयर दाखले,  अधिवास, रहिवास दाखले, जॉब कार्ड वाटप, अंत्योदय रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे आदेश, अनाथ बालकांचे प्रमाणपत्र,  कृषी विभागामार्फत ट्रॅक्टर,  आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना बि-बियाणे वाटप असे विविध लाभ देण्यात आले.

आ. पिंपळे म्हणाले की, शासन आपल्या दारी हे शिबिर म्हणजे शासन, प्रशासन आणि जनता यांचा दुग्धशर्करा योग होय. यामुळे सर्व विभाग एकत्रितरित्या एकाच ठिकाणी जनतेसाठी उपलब्ध असतात. जनतेची सर्व कामे एकाच ठिकाणी होतात. जनतेचा वेळ वाचतो. या उपक्रमामुळे जनतेच्या कामांचा गती मिळेल.  लोकांकडून आलेल्या सर्व अर्जांचा निपटारा प्रशासनाने करावा,अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. या शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आ. पिंपळे यांनी नागरिकांना केले.

आभार प्रदर्शन निवासी नायब तहसिलदार हर्षदा काकड यांनी केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ