अकोल्याच्या दोघा तरुणांच्या ‘स्टार्टअप’ला पुरस्कार







अकोला,दि.२६(जिमाका)- ‘ॲग्रोशुअर’ या नावाने कृषी अवजारांच्या उत्पादनात नाविन्यपूर्ण प्रयोग करुन शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात कृषी अवजारे उत्पादन करणाऱ्या अकोल्याच्या अक्षय वैराळे व अक्षय कवळे या दोघा विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपला नुकताच युनायटेड नेशन डेव्हलेपमेंट प्रोग्रॅम, अटल इनोव्हेशन मिशन व निती आयोग आयोजित ‘युथ को-लॅब’ स्पर्धेतील लैंगिक समानता व महिला आर्थिक सक्षमीकरण या गटातील पुरस्कार मिळाला आहे.

ॲग्रोशुअर प्रॉडक्टस ॲण्ड इनोव्हेशन, शिवनी जि. अकोला येथे अक्षय वैराळे आणि अक्षय कवळे या दोघा तरुण उद्योजकांनी तीन वर्षांपूर्वी हा उद्योग लहान स्तरावर सुरु केला होता. हे दोघेही तरुण मेकॅनिकल इंजिनिअर असून  निर्मिती व विपणन या दोन्ही बाजू हे दोघे उद्योजक सांभाळतात.  या उद्योगातून ते नऊ जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करुन देतात. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडतील असे ट्रॅक्टर व पॉवर विडर चलित जोडणी अवजारे बनवितात. त्यांच्या अवजारांमुळे शेतकऱ्यांना कोळपणी, निंदणी, फवारणी, पेरणी, मशागतीची कामे इ. यंत्रचलित करता येतात. त्यामुळे मजूरीच्या खर्चात बचत होते. शिवाय ही यंत्रे स्वतः शेतकरी, कुटुंबातील महिला असे कुणीही चालवू, हाताळू शकतात. 

त्यांच्या याच श्रेणीतील कोळपणी व फवारणी यंत्र या यंत्राच्या स्टार्टअपला युनायटेड नेशन डेव्हलेपमेंट प्रोग्रॅम व निती आयोग आयोजित ‘युथ को-लॅब’ स्पर्धेतील ‘लैंगिक समानता व महिला आर्थिक सक्षमीकरण’, या गटातील पुरस्कार मिळाला आहे.नुकताच (दि.२० जून) नवी दिल्ली येथे युनायटेड नेशन डेव्हलेपमेंट प्रोग्रॅमच्या भारतातील प्रतिनिधी श्रीमती शोको नोडा व अटल इनोव्हेशन मिशनचे  प्रकल्प प्रमुख डॉ. चिंतन वैष्णव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांना २ लाख ४० हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला असून या स्पर्धेसाठी आलेल्या ३७८ स्टार्टअप्स मधून अंतिम १२ स्टार्टअप्सची निवड झाली. त्यात ‘लैंगिक समानता व महिला आर्थिक सक्षमीकरण’, या गटातील पुरस्कार ‘ॲग्रोश्युअर’च्या या दोघा होतकरु व हुशार इंजिनिअर्सना मिळाला.

या दोघा होतकरु इंजिनिअर्सना सन २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य नाविन्यता परिषद अंतर्गत जिल्हा नाविन्यता परिषदेने ५ लक्ष रुपयांचे अनुदान सोयाबीन व हरभरा कापणी यंत्रासाठी दिले होते. त्यातून त्यांच्या स्टार्टअपची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांना आयआयटी कानपूर कडून पॉवर विडर चलित विविध नाविन्यपूर्ण अवजारांसाठी १० लाख रुपयांचे अनुदान मिळाले होते. त्यानंतर त्यांना मुंबई येथील वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामिण विकास प्रतिष्ठानचा आधुनिक कृषी यंत्र निर्मिती पुरस्कारही मिळाला आहे. आता सध्या त्यांना गुरुग्राम येथे दि.३ व ४ जुलै रोजी होत असलेल्या जी २० परिषदेत त्यांची उत्पादने प्रदर्शनात मांडण्याची संधीही मिळाली आहे.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ