मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम: मतदार यादीत नावनोंदणी, वगळणे, दुरुस्ती,छायाचित्र दुरुस्ती करण्याची संधी: पुनरिक्षण कार्यक्रम मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी राजकीय पक्षांनी जनजागृती करावी- प्रशासनाचे आवाहन

 




अकोला, दि.१९(जिमाका)- भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार दि.१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर  आधारीत अकोला जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचा छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मतदारांनी नावे नोंदविणे, वगळणे, केंद्र बदल इ.  कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे देऊन करता येतील अथवा ऑनलाईन पद्धतीने करता येतील. या कार्यक्रमात राजकीय पक्षांनी मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविणे, वगळणे, छायाचित्र अपडेट करणे इ. अद्यावतीकरणाबाबत मतदारांना आवाहन करुन जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेने केले.

यासंदर्भात आज उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी शरद जावळे. सहा. निवडणूक अधिकारी संतोष शिंदे, नायब तहसिलदार अतुल सोनोने तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मनोज पाटील, रमेश इंगळे, विजय येलकर, आनंद वानखडे, रविंद्र तायडे, अजबराव ताले आदी उपस्थित होते.                                                                

यावेळी महेश परंडेकर यांनी उपस्थितांना मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.

मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम

शुक्रवार दि.२१ जुलै ते सोमवार दि.२१ ऑगस्ट  मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देऊन  तपासणी /पडताळणी. मंगळवार दि.२२ ऑगस्ट ते शुक्रवार दि.२९ सप्टेंबर  मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, मतदान यादी, मतदान ओळखपत्रातील त्रुटींची दुरुस्ती करणे, आवश्यक तेथे प्रतिमांची गुणवत्ता सुधारणा करणे, विभाग/ यादी भाग तयार करणे. मतदान केंद्राच्या सिमा निश्चित करणे, त्यांना मान्यता प्राप्त करुन घेणे, नियंत्रण तक्ता अद्यावत करणे, शनिवार दि.३० सप्टेंबर ते सोमवार दि.१६ ऑक्टोबर नमुना १ ते ८ तयार करणे, दि.१ एप्रिल २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत पुरक व एकात्मिक प्रारुप मतदार यादी तयार करणे, मंगळवार दि.१७ ऑक्टोबर एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, मंगळवार दि.१७ ऑक्टोबर ते गुरुवार दि.३० नोव्हेंबर दावे हरकती स्विकारण्याचा कालावधी, विशेष मोहिमा ह्या मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी निश्चित केलेल्या दिवसांना आयोजीत होतील. मंगळवार दि.२० डिसेंबर पर्यंत दावे व हरकती निकाली काढणे, बुधवार दि.२६ डिसेंबर मतदार यादी छपाईसाठी आयोगाची परवानगी घेणे, सोमवार दि.१ जानेवारी २०२४  अंतिम मतदार यादीचे मुद्रण, शुक्रवार दि.५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे.

विधानसभा मतदारसंघांच्या प्राथमिक माहितीचा गोषवारा

२८- अकोट- या मतदारसंघात अकोट व तेल्हारा  हे दोन तालुके समाविष्ट असून १४ महसूल मंडळे आहेत.  एकूण गावे २९२ आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार २२००१० पुरुष व २०७८८९ महिला अशी एकूण ४२७८९९ लोकसंख्या आहे. तर दि.१ एप्रिल २०२३ मधील प्रारुप मतदार यादीनुसार १५१८२७ पुरुष, १३८३८७ महिला तर ५ इतर असे एकूण २९०२१९ मतदार आहेत.मतदार यादी भाग ३३१ असून मतदान केंद्र संख्याही ३३१ आहे.

२९ -बाळापूर- या मतदारसंघात बाळापूर व पातूर हे दोन तालुके समाविष्ट असून १४ महसूल मंडळे व १९८ गावे आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार १६९०१६ पुरुष व १५९१२६ महिला अशी एकूण ३२८१४२ लोकसंख्या आहे. तर दि.१ एप्रिल २०२३ मधील प्रारुप मतदार यादीनुसार १४८१९२ पुरुष, १४५२५२ महिला असे एकूण २९३४४४ मतदार आहेत.मतदार यादी भाग ३३८ असून मतदान केंद्र संख्याही ३३८ आहे.

३०- अकोला पश्चिम- या मतदारसंघात अकोला शहर क्षेत्राचा समावेश असून दोन महसूल मंडळे आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार २१७३९३ पुरुष व २०८४२४ महिला अशी एकूण ४२५८१७ लोकसंख्या आहे. तर दि.१ एप्रिल २०२३ मधील प्रारुप मतदार यादीनुसार १६२१४९ पुरुष, १५४२६१ महिला  तर १८ इतर असे एकूण ३१६४२८ मतदार आहेत.मतदार यादी भाग ३०७ असून मतदान केंद्र संख्याही ३०७ आहे.

३१- अकोला पूर्व- या मतदारसंघात अकोला ग्रामिण भागाचा समावेश असून त्यात १२ महसूल मंडळे आहेत व २०३ गावांचा समावेश आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार २६९३६२ पुरुष व २६४४९० महिला अशी एकूण ५३३८५२ लोकसंख्या आहे. तर दि.१ एप्रिल २०२३ मधील प्रारुप मतदार यादीनुसार १६९०४० पुरुष, १५९४३१ महिला  तर १४ इतर असे एकूण ३२८४८५ मतदार आहेत.मतदार यादी भाग ३४७ असून मतदान केंद्र संख्याही ३४७ आहे.

३२- मुर्तिजापूर- या मतदारसंघात मुर्तिजापूर व बार्शीटाकळी हे दोन तालुके समाविष्ट असून १४ महसूल मंडळांचा समावेश आहे. तर ३२४ गावे आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार १६६८६५ पुरुष व १५७१४८ महिला अशी एकूण ३२४०१३ लोकसंख्या आहे. तर दि.१ एप्रिल २०२३ मधील प्रारुप मतदार यादीनुसार १५५१२२ पुरुष, १३९१३५ महिला  तर ६ इतर असे एकूण २९४२६३ आहेत.मतदार यादी भाग ३८१ असून मतदान केंद्र संख्याही ३८१ आहे.

 जिल्ह्यात एकूण ७८६३३० पुरुष, ७३६४६६ महिला तर ४३ इतर असे एकूण १५२२८३९ मतदार आहेत. आता नवीन दि.१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत पुनरिक्षण कार्यक्रम राबविल्यानंतर या संख्येत बदल होऊ शकतात.

नाव नोंदणी,दुरुस्तीसाठी कोणता अर्ज भराल?

मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करणे, वगळे, छायाचित्रात दुरुस्ती करणे इ. विविध प्रकारे सुधारणा करण्यासाठी खालील प्रमाणे नमुना अर्ज भरावयाचा आहे.

मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६,

मतदार यादीतून समाविष्ट असलेले नाव वगळणी करण्याकरीता नमुना ७,

मतदार यादीत समाविष्ट नाव तसेच अन्य तपशिल (उदा. पत्ता वगैरे) व छायाचित्रात दुरुस्ती करण्यासाठी नमुना ८,

अनिवासी भारतीयांना मतदार यादीत नाव समाविष्ठ करण्यासाठी नमुना ६ अ,

मतदार ओळखपत्र बदलासाठी नमुना ००१.

मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी दि.४ जुलै पासून

निवडणूक आयोगाकडून अकोला जिल्ह्यात  नवी मतदार यंत्रे प्राप्त झाली असून  त्यांची प्रथमस्तरीय तपासणी दि.४ जुलै पासून एम.आय.डी.सी. शिवणी फेज ४ वखार महामंडळ गोदाम क्र.६ , अकोला येथे सुरु होणार आहे. जिल्ह्यात नव्याने एम-३ प्रकारची मतदान यंत्रे दाखल झाली आहेत. त्यात बॅलेट युनिट ३४५०, कंट्रोल युनिट २०५०, व्हीव्हीपॅट २७६० दाखल झाले आहेत. याशिवाय जुन्या प्रकारातील ९२१ बॅलेट युनिट, ४९५ कंट्रोल युनिट, ९ व्हीव्हीपॅट यंत्रे आहेत, अशी माहितीही निवडणूक शाखेने दिली.

या ठिकाणीही राजकीय पक्षांनी आपले प्रतिनिधी नेमावे , जेणेकरुन सर्व तपासणी ही पारदर्शक पद्धतीने होऊ शकेल असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ