प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना


 अकोला,दि.2(जिमाका)- पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना मृग बहार सन 2023 मध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरु, लिंबू, सिताफळ व द्राक्ष (क) या आठ फळपिकांसाठी 26 जिल्ह्यांमध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होणे बाबत अथवा न होणेबाबत घोषणपत्र ज्या बँकेमध्ये पिककर्ज खाते किंवा किसान क्रेडिट कार्ड खाते आहे तिथे जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित फळपिकांकरिता विहित नमुन्यातील घोषणापत्र संबंधित बँकेत सादर करणे आवश्यक राहिल. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बॅंकांना कळविणार नाहीत असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातुन वजा करण्यात येईल.

अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे (कुळाने किंवा भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी) या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त चार हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. त्यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडी विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. ही योजना मृग बहार सन 2023 मध्ये तीन विमा कंपन्यांमार्फत राज्यात राबविण्यात येत आहे.

जिल्हानिहाय विमा कंपनी

अहमदनगर, अमरावती, नाशिक, वाशिम, यवतमाळ, धुळे, पालघर, सोलापुर, नागपूर या नऊ जिल्ह्याकरिता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. ग्राहक सेवा क्र. : 18001024088 - दूरध्वनी क्र. 022 - 68623005. -मेल:- rgicl.maharashtraagri@relianceada.com.

बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली, सातारा, परभणी, जालना, लातुर, कोल्हापूर या बारा जिल्ह्याकरिता एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि. ग्राहक सेवा क्र. : 18002660700, दूरध्वनी क्र. 022-62346234 -मेल:-  pmfby.maharashtra@hdfcergo.com

बुलढाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद या पाच जिल्ह्याकरिता भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड टोल फ्री क्र. : 18004195004, दूरध्वनी क्र. 022 - 61710912 -मेल - pikvima@aicofindia.com

मृग बहार सन 2023 मध्ये फळपिक निहाय योजनेमध्ये शेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) योजनेतील सहभागाचा अर्ज करावा. विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था, बँक, आपले सरकार सेवा केंद्र,  विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे किंवा शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज अंतिम मुदतीत भरणा करावा.

विमा हप्ता भरण्याची मुदत

 संत्रा, द्राक्ष-(क), पेरु, लिंबू या फळपिकांसाठी दि. 14 जून, मोसंबी व चिकू फळपिकांसाठी दि. 30 जून तर डाळिंब फळपिकांसाठी दि. 14 जुलै व सिताफळ दि. 31 जुलै 2023 पर्यंत विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत आहे.   

            मृग बहार सन 2023 या वर्षासाठी अधिसूचित फळ पिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी निश्चित करण्यात आला असून निर्धारीत केलेले हवामान धोके लागू झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत देय होणार आहे. मृग बहारातील अधिसुचित फळपिकांची विमा नोंदणी करण्याकरीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल (https://pmfby.gov.in) या संकेतस्थळास भेट द्यावी.

शेतकऱ्यांनी अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची तसेच त्यांना भरावयाच्या विमा हप्त्याची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजीकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक किंवा वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा. मृग बहारातील अधिसुचित फळपिकांचे हवामान धोके, विमा संरक्षित रक्कम, विमा संरक्षण कालावधी, विमा हप्ता इत्यादी बाबतीत सविस्तर माहितीचा दि. 18 जून 2021 रोजीचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या https://www.maharashtra.gov.in कृषि विभागाच्या http://www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच ई - सेवा केंद्र व बँक स्तरावरही माहिती उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी सबंधित विमा कंपनीचे जिल्हा  किंवा तालुका कार्यालय किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ