गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार: ५८७ एकर क्षेत्रावर गाळ, जलसाठवण क्षमतेत १८ कोटी ८० लाख लिटर्सने वाढ



 अकोला, दि.१६(जिमाका)- शासनाच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाचे नियोजन, मदत आणि शेतकऱ्यांचा प्रतिसाद यामुळे अकोला जिल्ह्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५८७ एकर क्षेत्रावर धरणांमधून काढण्यात आलेला गाळ पसरवण्यात आला असून धरणातून काढण्यात आलेल्या गाळामुळे १८ कोटी ८० लाख लिटर्सने एकूण जलसाठवण क्षमतेत वाढ झाली आहे.

योजनेला मिळालेला प्रतिसाद व लांबलेला पावसाळा पाहता गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्यासाठी पहिला मोठा पाऊस येईपर्यंत मुदत  वाढवून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी  हरिभाऊ गिते यांनी दिली. याआधी ही मुदत दि.१५ जून पर्यंत होती ती आता वाढविण्यात आली आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेत आपापल्या शेतात गाळ वाहून न्यावा व आपली शेती अधिक सुपिक करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना शेतकऱ्यांसाठी जमिनीची सुपिकता वाढविणारी योजना आहे. त्यासाठी अशासकीय संस्थांतर्फे कार्यान्वयीन यंत्रणांमार्फत १६ ठिकाणी गाळ काढण्याचे काम करण्यात आले.  त्यात जिल्हातील ५२२ शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन आपल्या शेतात धरणातील गाळ पसरवून घेतला. तब्बल ५८७ एकर क्षेत्रावर १ लाख ८८ हजार ४२ घनमिटर गाळ पसरवण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात जलसाठवण क्षमतेत १८ कोटी ८० लाख लिटर्सने वाढ झाली आहे.

हे अभियान राबविण्यासाठी जिल्हा जलसंधारण अधिकारी, जलसंधारण विभाग, जिल्हा जलसंधारण अधिकारी लघु पाटबंधारे जि.प. अकोला, जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग, कार्यकारी अभियंता अकोला पाटबंधारे विभाग,  आदी यंत्रणा सहभागी आहेत. जिल्ह्यात एकूण १६ ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरु आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ