पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत कावड उत्सव नियोजनाबाबत बैठक भाविकांसाठी आवश्यक सुविधा; सुलभ परवानगी प्रक्रियेसाठी एक खिडकी योजना राबवा पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश
अकोला, दि. २३ : जिल्ह्याला पालखी उत्सवाची वैभवशाली परंपरा असून उत्सव काळात कायदे व सुव्यवस्था राखतानाच भाविकांसाठी सर्व आवश्यक सुविधा निर्माण कराव्या. कुठेही गैरसोय होता कामा नये, मंडळांना आवश्यक परवानग्यांसाठी एक खिडकी योजना राबवावी, असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यातील कावड व पालखी उत्सव श्री गणेशोत्सव वागामी काळातील संसवांच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था आवश्यक सुविधांचा आढावा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत नियोजनभवनात घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक अर्जित चांडक, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, महापालिका आयुक्त सुनील लहाने, अपर पोलीस अधीक्षक सी.के. रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, कावड पालखीसाठी सुरळीत मार्ग, सुरक्षिततेसाठी आवश्यक बॅरिकेटिंग, पेयजल, स्वच्छतागृहे याबरोबरच आवश्यक ठिकाणी आरोग्य पथकांची पुरेशी व्यवस्था असावी. पालखीची मोठी परंपरा व पावित्र्याची जपणूक व्हावी. हा उत्सव शांतता व सुव्यवस्थेसह पार पडावा. कायदे व सुव्यवस्था अबाधित राखून भाविकांना सर्व आवश्यक सुविधा चोखपणे पुरवाव्यात. ही वैभवशाली परंपरा वृध्दिंगत करण्यासाठी मंडळांनीही डॉल्बी डीजेचा वापर टाळून झांजा, ताशे पथक, दिंडी आदी पारंपरिक वाद्यांचा वापर व्हावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कावड यात्रा, गणेशोत्सव मिरवणूक मार्गावर अतिक्रमणे असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत. अतिक्रमणे असतील तिथे ती तत्काळ काढावीत व मार्ग मोकळा करावा. पर्यायी तसेच ॲप्रोच मार्ग मोकळे असावेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने रेलिंग, वॉचटॉवर, सीसीटीव्ही, संवेदनशील परिसरात बॅरिकेटिंग, मोठ्या पुलाची दुरूस्ती, रस्त्यावर लोंबकळणाऱ्या तारा दूर करणे आदी सर्व आवश्यक उपाय काटेकोर अंमलात आणावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. सर्व भाविकांची सुरक्षितता जपली जावी, तथापि दुर्देवाने काही अपघात घडल्यास संबंधीतांना सीएम रिलीफ फंडातून मदत मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. मात्र अशी घटना घडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व्हावे, असे निर्देश त्यांनी दिले.
पारंपरिक वाद्यांचा उपयोग करून डीजेमुक्त उत्सव साजरा करण्याचे आवाहन आमदार श्री. सावरकर यांनी केले. शिवभक्त मंडळ, गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी तसेच विजय अग्रवाल, सिध्दार्थ शर्मा, अनिल गरड, सतीश ढगे, चंदु सावजी, अमोल गोगे, जयंत मसने, बंटी चौरसिया यांच्यासह अनेक मान्यवरांनी विविध सुचना केल्या. त्यानुसार भाविकांसाठी सर्व आवश्यक सुविधा निर्माण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा