कावड यात्रेबाबत प्रशासन व मंडळांच्या प्रतिनिधींत चर्चा कावड यात्रा शांततेत पार पडण्यासाठी मंडळांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी अजित कुंभार










 
अकोला, दि. 10 : जिल्ह्यातील कावड पालखी यात्रेला थोर वैभवशाली परंपरा आहे. या पवित्र यात्रेसाठी भाविकांना आवश्यक सर्व सुविधा प्रशासनाकडून देण्यात येतील. या उत्सवाचे पावित्र्य टिकविण्यासाठी आणि तो शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक शिस्तीचे पालन करून मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.
श्रावण महिन्यातील कावड यात्रेच्या नियोजनाबाबत विविध कावड मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस अधिक्षक अर्जित चांडक, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, महापालिका आयुक्त सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, विविध विभागाचे अधिकारी  व मंडळांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, कावड यात्रेच्या मार्गाची पाहणी करण्यात आली आहे. यात्रेत भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जाईल. पथदिवे, ठिकठिकाणी पेयजल, मोबाईल, स्वच्छतागृहे, रूग्णवाहिकेसह वैद्यकीय पथके, घाटाच्या ठिकाणी आवश्यक सोयी, रस्त्यांची दुरूस्ती, वाहनतळ आदी सुविधा निर्माण केल्या जातील. यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडता कामा नये. हा वैभवशाली उत्सव अधिक उंचीवर नेण्यासाठी व सामाजिक सलोखा राखण्यासाठी मंडळ व शिवभक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
 
पोलीस अधिक्षक श्री. चांडक म्हणाले की, यात्रेचा मंदिर परिसरातील प्रवेशाचा व बाहेर पडण्याचा मार्ग वेगवेगळा असावा, ही बाब विचाराधीन आहे. जेणेकरून एकाच वेळी गर्दी न होता भाविकांना वेळेत जलाभिषेक, दर्शन घेणे शक्य होईल. याबाबत सविस्तर चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल.  
सर्व मंडळांनी नियमांचे पालन करावे. कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीसांकडून मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येईल.  भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण केल्या जातील. घाटासह सर्व प्रमुख ठिकाणी पुरेशा प्रकाशासाठी हॅलोजन दिवे, वॉच टॉवर, सुरक्षिततेसाठी मार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा, आवश्यक तिथे ड्रोनचा वापर आदी बाबींची पूर्तता केली जाईल.
सर्वांनी यात्रेचे पावित्र्य राखणे गरजेचे आहे. व्यसनींवर, तसेच शस्त्र बाळगणा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.
 
 
 
महापालिका आयुक्त श्री. लहाने म्हणाले की, पालखी मार्गावर हॅलोजन दिवे, स्वच्छता, फिरती स्वच्छतागृहे आदी सुविधा निर्माण केल्या जातील. विविध बाबी लक्षात घेऊन तशी पथके महापालिकेतर्फे निर्माण करण्यात येतील. उत्सवकाळात उघड्यावरील मांसविक्री बंद ठेवली जाईल, तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी अडथळा ठरणा-या झाडांच्या फांद्या कापणे व इतर आवश्यक सर्व बाबी पूर्ण केल्या जातील.
अकोट, बाळापूर, पातूर येथील व्यवस्थेबाबतही यावेळी चर्चा झाली. कावड मंडळाचे राजेश भारती, तरूण बगेरे, पप्पू मोरवाल, दिलीप नायसे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी  व अनेक मंडळांचे पदाधिकारी व शिवभक्त उपस्थित होते.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा