पालकमंत्र्यांकडून अतिवृष्टी परिस्थितीचा आढावा पंचनाम्याची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी एकही पात्र नागरिक मदतीपासून वंचित राहू नये - पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

 












पालकमंत्र्यांकडून अतिवृष्टी परिस्थितीचा आढावा

पंचनाम्याची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी

एकही पात्र नागरिक मदतीपासून वंचित राहू नये

-         पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

अकोला, दि. २३ : जिल्‍ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात पंचनाम्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना व नागरिकांना आवश्यक मदत मिळवून द्यावी. एकही पात्र नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये याची काटेकोर खबरदारी घ्यावी, असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील पाऊस परिस्थिती, बाळापूर तालुक्यातील अतिवृष्टी, मदत आदी विविध बाबींचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री ॲड. फुंडकर यांच्या अध्यक्षतेत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

बाळापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे 150 घरांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे 18 गावांमध्ये तुर, सोयाबीन, कपाशी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानाचे सविस्तर व तपशीलवार पंचनामे करावेत. एकही पात्र व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये. नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. शासन आपदग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

नदीकाठांवरील गावे, वस्त्या, वाड्या आदी ठिकाणी पावसाळा लक्षात घेऊन सतर्कता बाळगावी व आवश्यक उपाय अंमलात आणावेत, असेही निर्देश त्यांनी दिले. आपत्तीबाबतचे यापूर्वीचे पंचनामे, मदतीचे प्रस्ताव, प्राप्त निधी व मदत वितरण आदी विविध बाबींचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी सादरीकरण केले.

000000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा