शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश केवळ कागदावर नको; प्रत्यक्षात कार्यवाही करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
केवळ कागदावर नको; प्रत्यक्षात कार्यवाही करा
-
जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. १७ : जिल्ह्यातील सर्व शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त
करावेत. केवळ कागदावर कार्यवाही न करता प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी, असे सुस्पष्ट
आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.
जिल्हा अमली पदार्थ प्रतिबंध समन्वय समितीच्या बैठक जिल्हाधिका-यांच्या
दालनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. अपर पोलीस अधिक्षक सी. के. रेड्डी, उपविभागीय
अधिकारी शरद जावळे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, भावी पिढीला व्यसनांपासून मुक्त
ठेवण्यासाठी योग्य माहितीचा प्रसार, तसेच संबंधित नियम, अधिनियमांची कठोर अंमलबजावणी
होणे आवश्यक आहे. केवळ शाळाच नव्हे, तर नियमानुसार परिसरही तंबाखूमुक्त झाला पाहिजे.
कागदावर नको; प्रत्यक्षातील कार्यवाही झाली पाहिजे. शाळांलगतच्या परिसरात तंबाखूजन्य
पदार्थांची विक्री होता कामा नये. त्यासाठी नुसते फलक लावून उपयोग नाही. अशी दुकाने
असतील तर पोलीसांची मदत घेऊन ती तत्काळ हटवावीत. एका महिन्यात जिल्ह्यातील सर्व शाळांचे
परिसर तंबाखूमुक्त झाले पाहिजेत.
अमली पदार्थाची वाहतूक होऊ नये म्हणून आवश्यक तिथे वाहनांच्या तपासण्या,
सार्वजनिक ठिकाणांची नियमित देखरेख, उत्पादन होऊ नये म्हणून कारखान्यांच्या तपासण्या,
संशयास्पद स्थळांचा शोध व कारवाई आदींचे कटाक्षाने पालन व्हावे. अंमली पदार्थांची वाहतूक, विक्री, वापर याला
प्रतिबंध करतानाच, या पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत भरीव जनजागृती करावी, असे निर्देश
जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी दिले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा