कावड यात्रेसाठी प्रशासनाकडून प्रमाणित कार्यपद्धती निश्चित
कावड यात्रेसाठी प्रशासनाकडून प्रमाणित कार्यपद्धती निश्चित
अकोला, दि. 17 : श्रावण सोमवारी मोठ्या प्रमाणावर आयोजित कावड यात्रा
व पालखी मिरवणूक लक्षात घेऊन हा उत्सव शांततेत पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून
प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे, तसेच विविध अधिका-यांना जबाबदा-या
नेमून देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी
अजित कुंभार यांनी याबाबतचा आदेश निर्गमित केला आहे. कावड, पालखी उत्सवानिमित्त अकोला
शहरामध्ये व पालखी मार्गाकरिता अकोल्याचे उपविभागीय दंडाधिकारी डॉ. शरद जावळे यांना.
तसेच अकोटचे उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांना तिस-या सोमवारी (११ ऑगस्ट) धारगड
येथे होणा-या यात्रेसाठी इन्सिडंट कमांडर म्हणून नेमण्यात आले आहे.
गांधीग्राम येथे पूर्णा नदीच्या पुलावर लायटिंगची व्यवस्था, आपातापा
चौकात वॉच टॉवर, मंदिर परिसरात बांबू बॅरेकेटिंग, अकोटपेठेतील उघड्यावर होणारी मांसविक्री
बंद ठेवणे, पालखी मार्गावर अधिकारी, कर्मचा-यांची पथके नेमणे आदींसाठी महापालिका उपायुक्त
गीता ठाकरे यांच्याकडे डेप्युटी इन्सिडंट कमांडर म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
सर्व भाविकांना स्वच्छ व शुध्द पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरूस्ती, आवश्यक
ठिकाणी मोबाईल स्वच्छतागृहे, रस्तेसफाई, अतिक्रमण काढणे, अग्निशमन व्यवस्था, क्रेन,
वैद्यकीय पथके, संवेदनशील भागात, चौकात सीसीटीव्ही आदी व्यवस्था उभारण्याचे आदेश आहेत.
गांधीग्राम
येथील पुर्णा नदीवरचा घाट व पुलावरील तुटलेले कठड्यांची दुरूस्ती, घाटावरील स्वच्छता,
पार्किंग व्यवस्था, पूर्णा नदी पात्रापासून
ते श्री राजराजेश्वर मंदिरापर्यंत रस्त्याबाबतच्या अडचणी दूर करणे, रस्ता दुरूस्ती, मिरवणूक मार्गावर बाजूला
रिफ्लेक्टर, आपातापा चौक ते पाचमोरी रस्त्यातील दुभाजकाची दुरूस्ती आदी जबाबदा-या
‘पीडब्ल्यूडी’चे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी
अभियंता श्री. कथलकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
महिला कावड सुरक्षेच्या दृष्टीने कार्यवाही, कायदा व सुव्यवस्था राखणे,
रहदारी नियंत्रण, रस्त्यावर पेट्रोलिंग करणे, पालखीसोबत किमान 2 स्पीकर घेऊन जाण्यास
परवानगी देणे, आवश्यक त्या ठिकाणी बॅरेकेटिंग, आवश्यक प्रतिबंधात्मक कार्यवाही, नियंत्रण
कक्ष 24 तास चालू ठेवणे, मिरवणूक मार्गावरील अतिसंवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस मनुष्यबळ
व बंदोबस्त, परिवहन विभागाकडून वाहनांची तपासणी आदी जबाबदा-या उपविभागीय पोलीस अधिकारी
सतीश कुलकर्णी, प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, तहसीलदार सुरेश कव्हळे आदींना
सोपविण्यात आल्या आहेत.
मार्गावर वैद्यकीय पथक, रूग्णवाहिका, औषधसाठा आदी विविध जबाबदा-या जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे व जिल्हा आरोग्य अधिका-यांना देण्यात आल्या आहेत.
कासली फाटा, उगवा फाटा, घुसर फाटा, भोड फाटा, प्रेशर पॉईंट येथे लाईटची
व्यवस्था, नियमित वीजपुरवठा, लोंबकळणा-या वीजतारा हटविणे, घाटावर प्रकाशाची व्यवस्था
आदी कामे महावितरणचे शहर अभियंता श्री. पावडे, ग्रामीण अभियंता श्री. सपकाळे, कार्यकारी
अभियंता विनोद हंबर्डे व इतर अधिका-यांवर सोपविण्यात आली आहेत.
श्री क्षेत्र
धारगड येथे यात्रेत कायदा व सुव्यवस्था राखणे, वैद्यकीय पथक, रूग्णवाहिका, स्वच्छता,
वाहतूक नियंत्रण, दुभाजके, नियंत्रण कक्ष आदी विविध जबाबदारी अकोट येथील उपविभागीय
पोलीस अधिकारी गजानन पडघन, तहसीलदार सुनील चव्हाण आदींवर सोपविण्यात आली आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा