गरजूंना उपचार व मदतीसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी

 

 

गरजूंना उपचार व मदतीसाठी

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी

अकोला, दि. २१ : मुख्यमंत्री सहायता निधीतून गरजूंना वैद्यकीय मदतीसाठी ३० लक्ष रू. हून अधिक रकमेतून विविध रूग्णांना उपचार मिळवून देण्यात आले आहेत. ही योजना गरीब व गरजू रूग्णांसाठी महत्वाचा आधार ठरली आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीत पहिल्या मजल्यावर हे कार्यालय सुरू आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते या कार्यालयाचा शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी अजित कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनात कक्षातर्फे गुणवत्तापूर्ण कार्यवाही होत आहे. जिल्ह्यातील गरजू रूग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष आधार ठरत आहे.

धर्मादाय आयुक्त कार्यालयाअंतर्गत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्तपेढीसह प्रमाणित रूग्णालये १२ आहेत. इतर प्रमाणित रूग्णालयांची संख्या ४४ आहे. जिल्ह्यात वैद्यकीय मदतीचे ३७ हून अधिक प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

   महाराष्ट्रातील गरजू व पात्र रूग्णांना वैद्यकीय उपचाराकरिता आर्थिक मदतीचा हातभार लावण्याकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने सुरू केलेला हा लोकोपयोगी व महत्वाकांक्षी उपक्रम आहे. कक्षातर्फे उपचार मदतीबरोबरच कक्षातर्फे रक्तदान शिबिरांद्वारे रक्तपिशव्यांचे संकलन, आपत्ती व्यवस्थापनासाठी मॉक ड्रिल, लाभार्थ्यांमध्ये वृक्षारोपणाबाबत प्रबोधन असे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती डॉ. विशाल येदवर यांनी दिली.

 

 या उपक्रमाचा लाभ घेण्याकरिता अर्जदारांना महाराष्ट्राचा रहिवासी असावा लागतो. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न १.६० लाखांच्या आत व शिधापत्रिका कार्ड आणि आधारपत्र असणे आवश्यक आहे. उपचार घेत असलेले रूग्णालय महाराष्ट्र राज्यामधील असणे आवश्यक असून रूग्णालयाची नोंद मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या प्रणालीमध्ये असणे आवश्यक असते.

विविध आजारांवरील उपचारांसाठी मदत मिळते. कॉकलियर ईम्प्लांट (वय ३ वर्षांपर्यंत), हृदय, यकृत,किडनी, फुप्फुस, बोन मॅरो आणि हाताचे प्रत्यारोपण, कर्करोग, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदुरोग, हृदयरोग आणि हिप रिप्लेसमेंट सर्जरी यासह डायलिसिस, केमोथेरेपी, रेडिएशन, नवजात शिशुंचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, भाजलेले रूग्ण, अस्थीबंधन आणि विद्युत अपघात यांचा समावेश होतो.

या वैद्यकीय कक्षाकडून अर्थसहाय्य प्राप्त करण्याकरिता विहित नमुन्यातील अर्ज, वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रकाची मूळप्रत, डॉक्टरांच्या सहि व शिक्यासह (खाजगी रुग्णालय असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडुन प्रमाणीत करणे आवश्यक आहे), तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (रु. १.६० लक्ष पेक्षा कमी), रुग्णाचे आधार कार्ड (महाराष्ट्र राज्याचे)/नवजात बाळासाठी आईचे आधारकार्ड आवश्यक आहे, रुग्णाचे रेशन कार्ड (महाराष्ट्र राज्याचे), संबधीत आजाराचे रिपोर्ट (इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टस) असणे आवश्यक, रुग्णाचा पासपोर्ट फोटो, अवयव प्रत्यारोपण रुग्णांसाठी झेडटीसीसी/ शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे, रस्ते अपघात असल्यास एफआयआरची प्रत जोडणे आवश्यक आहे.

विहीत नमुन्यात मुळ अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह मुख्यमंत्री

 वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयाची मुख्य इमारत, अकोला येथे सादर करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना https://cmrf.maharashtra.gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
०००

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा