‘नाबार्ड’चा वर्धापनदिन शेतीपूरक व्यवसायांसाठी विविध योजनांचा लाभ घ्यावा कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन
‘नाबार्ड’चा वर्धापनदिन
शेतीपूरक व्यवसायांसाठी विविध योजनांचा
लाभ घ्यावा
कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन
अकोला, दि. १७ : दुग्धव्यवसायाला शेतीचा
दर्जा मिळाला असून, दुग्धविकास व पूरक व्यवसायांसाठी ‘नाबार्ड’तर्फे विविध योजना राबविण्यात
येत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेतकरी सहकारी
संस्थांचे प्रतिनिधी व शेतकरी बांधवांना कार्यशाळेद्वारे आज करण्यात आले.
‘नाबार्ड’च्या वर्धापनदिनानिमित्त जि.प.प्राथमिक
शिक्षक सहकारी संस्थेच्या इमारतीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा उपनिबंधक
डॉ. प्रवीण लोखंडे अध्यक्षस्थानी होते. नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्रीराम
वाघमारे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नयन सिन्हा, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे विभागीय
व्यवस्थापक श्री. गटकळ, अकोला-वाशिम जिल्हा
सहकारी बँकेचे श्री. पारधी, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे संचालक विद्याशंकर,
डॉ. स्वप्नील कुकडे, श्री. तेलगोटे आदी उपस्थित होते.
संगणकीकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील
सर्व संस्था ऑनलाइन प्रक्रियेच्या दिशेने जात आहेत. संस्थांच्या बळकटीकरणातून कृषी
सहकाराचा विकास होत असल्याचे डॉ. लोखंडे यांनी सांगितले.
श्री. वाघमारे यांनी १९८२ पासून नाबार्डने
ग्रामीण आणि शेती विकासासाठी उचललेल्या महत्त्वपूर्ण पावलांची माहिती दिली. त्यांनी
फार्मर क्लब, स्वयंसहायता समूह बँक लिंकेज, किसान क्रेडिट कार्ड, आरआयडीएफ , पीओडीएफ
यांसारख्या योजनांवर प्रकाश टाकला.
सेवा सहकारी संस्थांच्या संगणकीकरणाच्या
माध्यमातून त्यांचे कर्जव्यवसायाबाहेरचे शेतीपूरक उद्योग विकसित करण्यासाठी नाबार्ड
काम करत आहे. विशेषतः दुग्ध व्यवसाय, दुग्ध संकलन केंद्रे उभारण्याच्या संधींबाबतही
त्यांनी माहिती दिली. अकोल्यातील व्याळा गावातील यशस्वी उपक्रमाचा उल्लेख करत अनेक
संस्था दुग्ध व्यवसायाच्या दिशेने वाटचाल करू शकतात असे ते म्हणाले.
ज्ञानेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीचे श्री.
गि-हे, ग्रामपुत्र शेतकरी उत्पादक कंपनीचे श्री. ढोकणे आणि बाळादेवी शेतकरी उत्पादक
कंपनीचे शशिकांत नकासकर, श्री. गटकळ, श्री. सिन्हा यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. स्वप्नील कुकडे यांनी विदर्भ मराठवाडा
डेअरी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत शेतकऱ्यांसाठी उभ्या असलेल्या सुवर्णसंधीबद्दल
सविस्तर माहिती दिली. जनावरांची खरेदी, दुग्ध प्रक्रिया, अर्थसहाय्य या बाबतीत मिळणाऱ्या
लाभांविषयी माहिती देण्यात आली. जिल्हा सहकारी बँकेचे श्री. थोरात यांनी कर्जप्रक्रियेबाबत
मार्गदर्शन केले. श्री. वाघमारे यांनी आभार मानले.
विविध संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे
संचालक, सेवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सचिव, पंच कमिटी सदस्य आणि माविम-सीएमआरसीचे
प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा