जिल्ह्याच्या लिंग गुणोत्तर प्रमाणात सुधारणा


 

 

जिल्ह्याच्या लिंग गुणोत्तर प्रमाणात सुधारणा

 

अकोला, दि. २४ : लिंग निवड प्रतिबंधक कायदे, नियम, यंत्रणांकडून काटेकोर तपासणी व जनजागृती यामुळे अकोला जिल्ह्याच्या लिंग गुणोत्तर प्रमाणात काही सुधारणा झाली आहे. सीआरएस अहवालानुसार अकोला जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण एक हजार पुरूषांमागे ९४० महिला इतके झाले आहे.

पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समितीची बैठकीत ही माहिती समोर आली. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वंदना पटोकार यांच्या अध्यक्षतेत ही बैठक जिल्हा रूग्णालयात झाली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, समितीचे सदस्य जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, सामाजिक कार्यकर्ता डॉ. सीमा तायडे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. विजया पवनीकर, सामाजिक कार्यकर्ता प्रतिभा अवचार व समितीच्या विधी समुपदेशक ॲड. शुभांगी ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.

अकोला जिल्ह्यात २०२२-२३ या वर्षात दर एक हजार पुरुषांमागे ९०२ महिला, तर २०२३-२४ या वर्षात ९१९ असे लिंग गुणोत्तर प्रमाण होते. ते २०२४-२५ या वर्षात ९४० वर गेले आहे. काटेकोर तपासण्या व जनजागृतीमुळे जिल्ह्यात हे प्रमाण सुधारले आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वारे म्हणाल्या की, या कार्यात अधिक सुधारणांसाठी सोनोग्राफी सेंटरच्या अचानक तपासण्या, धाडी यांची संख्या वाढवावी. समितीच्या सदस्यांचा समावेश असलेल्या पथकाने अचानक भेटी द्याव्यात. समितीची दर महिन्यात एक बैठक घेण्याच्या सूचना आहेत. सोनोग्राफी केंद्रांनी दर महिन्याच्या ५ तारखेआधी अहवाल देणे आवश्यक आहे.

केंद्राची मान्यता, यंत्रणेचे हस्तांतरण, स्थलांतर व प्रत्यक्ष वापर, तपासणी याबाबत कायद्याने कठोर नियम घालून दिले आहेत. त्याचे पालन व्हावे. अनेकदा काही व्यक्ती तपासणीसाठी जिल्ह्याबाहेर किंवा परराज्यात जाण्याची शक्यता असते. अशावेळी नागरिकांनी, माहितगारांनी माहिती द्यावी व कायद्याच्या अंमलबजावणीला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रारंभी ॲड. ठाकरे यांनी सोनोग्राफी केंद्रांच्या मान्यता, नूतनीकरण, यंत्रणा हस्तांतरण आदींबाबतचे अर्ज, नियम यांची माहिती सादर केली. पीएनडीटी अर्थात गर्भधारणापूर्व वा प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यासंदर्भात अधिक जनजागृती व्हावी यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३४४७५ वर तसेच www.amchimulgi.com  या संकेतस्थळाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश डॉ. पटोकार यांनी दिले.

टोल फ्री क्रमांकावर वा वेबसाईटवर प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून कारवाई केली जाते. कारवाईत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यास माहिती देणाऱ्या एक लक्ष रुपये बक्षीस दिले जाते, अशी माहिती यावेळी ॲड. शुभांगी ठाकरे यांनी दिली. जिल्ह्यात कुठेही लिंगनिवडीसाठी बेकायदेशीर तपासणी होत असेल तर नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा