कोविड १९ संसर्गाची स्थिती जाणून घेण्यासाठी प्रशासनाची सिरॉलॉजिकल सर्वेक्षणाची तयारी

 


अकोला,दि.२७(जिमाका)- जिल्ह्यात कोविड १९ या विषाणू संसर्गाची स्थिती जाणून घेण्यासाठी  सिरॉलॉजिकल सर्वेक्षण करण्याची तयारी प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. यासंदर्भात आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे यासंदर्भात आढावा घेऊन सर्वेक्षणाचे नियोजन करण्याविषयी चर्चा केली.

यासंदर्भात आज सकाळी झालेल्या ऑनलाईन बैठकीस विभागीय आयुक्त पियुष सिंह  हे अमरावती येथून तर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये,  डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. उमेश जवळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा , निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी सहभागी झाले होते. यावेळी या सर्वेक्षणाचे राज्य नोडल अधिकारी डॉ. संजय झोडपे यांनी नागपूर येथून सहभागी होऊन मार्गदर्शन केले.

जिल्ह्यात प्रत्यक्ष ज्या तपासण्या झाल्या त्या व्यतिरिक्त किती लोकांपर्यंत कोविड चा संसर्ग पोहोचला?, किती जणांना त्याची बाधा होऊन त्यांच्या शरिरात  प्रतिकार शक्ती तयार झाली? त्यातून समुहाची प्रतिकारशक्ती तयार झाली की नाही? यासंदर्भात या सर्वेक्षणातून माहिती मिळेल. असे सर्वेक्षण  भारतीय वैद्यकीय अनुसंधानतर्फे देशात सध्या ८० जिल्ह्यात सुरु आहे. मात्र अकोला जिल्हा प्रशासनाने अकोला जिल्ह्यातही हे सर्वेक्षण राबविण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी एक लाखामागे १०० व्यक्तिंच्या रक्ताचे नमुने घेऊन सर्वेक्षण केले जाईल. या रक्त नमुन्यांच्या चाचण्या करण्यासाठी  ज्यांना आतापर्यंत कोरोना झालेला नाही अशा लोकांच्या रक्ताचे नमुने वेगवेगळ्या समुहातून घेण्यात येतील. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्रातील, शहरी –ग्रामिण, अति अजोखमीचे व्यक्ती, विविध वयोगटातील व्यक्ती या प्रमाणे विविध गटांमधील व्यक्तिंच्या रक्ताचे नमुने आरोग्य यंत्रणेमार्फत संकलित करुन चाचण्या केल्या जातील. या चाचण्यांमधून  त्या त्या व्यक्तिच्या शरिरात तयार झालेल्या प्रतिजैविक पेशींबाबत माहिती मिळेल, असे यावेळी सांगण्यात आले.

सध्या प्रशासन यासंदर्भात चाचण्या कशापद्धतीने राबवायच्या याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समुह औषध निर्माण व सुक्ष्मजीवशास्त्र या विभागांमार्फत नियोजन करावे, त्यासाठी आरोग्य विभागाच्या यंत्रणांचा सहयोग घ्यावा,असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ