सिरॉलॉजिकल सर्वेक्षणाला 7 सप्टेंबर पासून सुरुवात - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 



अकोला,दि.31 (जिमाका)-  जिल्ह्यात कोविड १९ या विषाणू संसर्गाची स्थिती जाणून घेण्यासाठी  सिरॉलॉजिकल सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाची सुरुवात सोमवार (दि.7) पासून होणार असून हा सर्वे सप्टेंबर अखेरपर्यंत राहणार असल्याचे माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. जिल्हाधिकारी यांच्या दालनात यासंदर्भात बैठक घेण्यात आली

 यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, मनपा आयुक्त संजय कापडणीस, डॉ. कुसूमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षीका डॉ. आरती कुलवाल, डॉ. उमेश कवळकर, डॉ. नेताम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यात प्रत्यक्ष ज्या तपासण्या झाल्या त्या व्यतिरिक्त किती लोकांपर्यंत कोविड चा संसर्ग पोहोचला?, किती जणांना त्याची बाधा होऊन त्यांच्या शरिरात जैव प्रतिकार शक्ती तयार झाली? त्यातून समुहाची प्रतिकारशक्ती तयार झाली की नाही? यासंदर्भात या सर्वेक्षणातून माहिती मिळणार आहे. असे सर्वेक्षण  भारतीय वैद्यकीय अनुसंधानतर्फे देशात सध्या ८० जिल्ह्यात सुरु आहे. मात्र अकोला जिल्हा प्रशासनाने अकोला जिल्ह्यातही हे सर्वेक्षण राबविण्याची भूमिका घेतली असून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सोमवार (दि.7) पासून सुरुवात होणार आहे.

  त्यासाठी एक लाखामागे १०० व्यक्तिंच्या रक्ताचे नमुने घेऊन सर्वेक्षण केले जाईल. शहरी भागातून 1400 रक्त नमूने तर ग्रामीण भागातून 1400 असे एकूण 2800 रक्त नमूने घेण्यात येणार आहे. असे रक्त नमुन्यांच्या चाचण्या करण्यासाठी  ज्यांना आतापर्यंत कोरोना झालेला नाही अशा लोकांच्या रक्ताचे नमुने वेगवेगळ्या समुहातून घेण्यात येतील. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्रातील, शहरी ग्रामिण, अति अजोखमीचे व्यक्ती, विविध वयोगटातील व्यक्ती या प्रमाणे विविध गटांमधील व्यक्तिंच्या रक्ताचे नमुने आरोग्य यंत्रणेमार्फत संकलित करुन चाचण्या केल्या जातील. या चाचण्यांमधून  त्या त्या व्यक्तिच्या शरिरात तयार झालेल्या प्रतिजैविक पेशींबाबत माहिती मिळेल, असे यावेळी सांगण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ