सणासुदीच्या दिवसांत कोरोना फैलाव रोखण्याबाबत खबरदारी घ्या पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

 


अकोला,दि.14 (जिमाका)- सध्या सुरु असलेला पाऊस तसेच आगामी गणेशोत्सवासारखे सण या काळात कोरोनाचे संक्रमण होऊन फैलाव रोखण्याबाबत जिल्हा ते ग्राम पातळीवरील यंत्रणांनी  खबरदारी घ्यावी, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज दिले.

दरम्यान अकोला जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्ण बरे होण्याचा दर राज्यात सर्वाधिक म्हणजेच 82.09 असल्याबद्दल ना. कडू यांनी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासन यंत्रणेचे अभिनंदन केले.

पालकमंत्री ना. कडू यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना उपाययोजनांबाबत आज आढावा घेण्यात आला. जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. कुसुमाकर घोरपडे, मनपाचे डॉ. फारुख शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तसेच उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी तसेच अन्य विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

यावेळी कोरोना संक्रमण व उपचार याबाबत सादरीकरण करण्यात आले. त्यात देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर दि. 9 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात 82.09 टक्के इतका असुन हा दर राज्यात सर्वाधिक आहे. याबद्दल यंत्रणेचे अभिनंदन केले. तथापि जिल्ह्यातील मृत्यूदर मात्र 4.1 टक्के इतका आहे, याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी होत असलेल्या चाचण्या, त्यातुन निदर्शनास येणारे रुग्ण याबाबतही स्थानिक अधिकाऱ्यांकडुन प्रतिसाद जाणुन घेण्यात आला.

यावेळी ना. कडू म्हणाले की, आता सणांचे दिवस येत आहेत. त्यामुळे यंत्रणांनी अधिक सर्तक रहावे. त्यासाठी किमान एक आठवडा आधी नियोजनबध्द पुर्वतयारी करा. स्थानिक स्तरावर लक्षणे आढळलेल्या रुग्णांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करा. लक्षणे न दिसणाऱ्या मात्र अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या घरीच अलगीकरणाची सुविधा असल्यास त्यांना घरातच अलगीकरणात राहुन उपचार घेण्याची मुभा द्या. चाचण्या करतांना अनेक लोकांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तिंच्या चाचण्या प्राधान्याने करा, असे निर्देश ना. कडू यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ