‘आत्मा’ तर्फे सोमवारी (दि.१०) रानभाज्या महोत्सव ;प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणीही आयोजन

 

अकोला, दि.६(जिमाका)- राज्याचे कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून रानभाज्यांचा महोत्सव प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात येत आहे.अकोला येथे येत्या सोमवारी म्हणजेच दि.१० रोजी प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालयाच्या आवारात, आर.डी.जी.महिला काँलेजसमोर, नेहरु पार्कच्या बाजुला, मूर्तीजापूर रोड अकोला येथे आयोजीत करण्यात आला आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक आत्मा मोहन वाघ यांनी दिली आहे.

       पावसाची रिपरिप सुरू झाली की रानभाज्याही बाजारात डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. प्रेमाने, निगुतीने या भाज्या बनवून खाल्ल्या जातात. पाऊस सुरु झाला की, या रानभाज्या रानोमाळी कोणत्याही मेहनतीशिवाय आपोआप उगवतात. वर्षातून एकदाच येणारा रानमेवा म्हणजे खऱ्या अर्थाने सेंद्रीय अन्न होय. कोणतंही खत किंवा कीटकनाशक नाही, कोणतीही लागवड नाही. अशा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे.त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांना रानभाज्या विषयी ओळख व माहिती व्हावी याकरीता कृषि विभागाच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने जिल्हा प्रकल्प संचालक (आत्मा) मोहन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली  सोमवार दि. १० रोजी  प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालयाच्या आवारात ‘रानमेवा महोत्सव-२०२०’, आर.डी.जी.महिला काँलेजसमोर, नेहरु पार्कच्या बाजुला मूर्तीजापूर रोड, अकोला येथे आयोजित करण्यात येणार आहे. याठिकाणी शेतकरी गटाच्या माध्यमातून रानभाज्यांचे विक्री सुद्धा केली जाणार आहे.

या महोस्तवात लोकांना सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझर व मास्कचा वापर इ. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्यक असून त्यासाठीच्या सर्व उपाययोजना करुन खबरदारी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी स्पष्ट केले आहे.

रानभाज्यांची ओळख व संवर्धन यामध्ये आदिवासी बांधवांचे फार मोठे योगदान असल्यामुळे तसेच संयुक्त राष्ट्र महासंघामार्फत ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवामध्ये जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या सर्व रानभाज्या व रानफळांची वैशिष्ठे, गुणधर्म व आरोग्यासाठी उपयोग, संवर्धन पद्धती, भाजीची पाककृती (रेसिपी) याची सचित्र माहिती देण्यात येईल. याद्वारे रानभाज्यांना ओळख मिळून त्यांची विक्रीव्यवस्था व उत्पादन साखळी निर्माण होईल. ग्राहकांना आरोग्यपुर्ण भाज्या उपलब्ध होण्यासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

यावेळी रानातील मेवा म्हणून अंबाडी,चिवळी,केना,शेवगा, सुरण,करवंद,आघाडा.टरोटा,पिंपळ,भूई आवळा,करटोली, राजगुरा,वाघाटे,फांदीची भाजी,कुंजीर भाजी,चमकुराचे पाने,काटसावर,जिवतीचे फुलं व इतर प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी रास्त भावात उपलब्ध असणारआहेत.

याच प्रमाणे प्रत्येक तालुक्यातील पंचायत समितीच्या सभागृहात सोमवार दि.१० रोजी तालुका कृषि अधिकारी,आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, पंचायत समिती कृषि अधिकारी, कार्यालयीन कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली रानभाज्या महोत्सव आयोजित होणार आहे. शहरातील सर्व नागरिकांनी रानभाजी महोत्सवामध्ये यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) मोहन वाघ यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ