शांतता समिती बैठक कोरोनाचे संक्रमण रोखणे; हीच खरी गणेश भक्ती- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


        अकोला,दि.२०(जिमाका)-
कोरोना संकटाच्या छायेत गणेशोत्सव साजरा करताना आपण सारे कायदा सुव्यवस्था तर राखणारच आहोत, मात्र माणसाचा जीव वाचवणे हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण रोखणे हीच गणेशाची भक्ती मानून आपण गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना केले.

            यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, सहाय्यक धर्मदाय आयुक्त सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष मोतिसिंग मोहता, कार्याध्यक्ष संग्राम गावंडे, सचिव तथा नगरसेवक सिद्धार्थ शर्मा, तसेच विविध मंडळांचे पदधिकारी, शांतता कमिटी,मोहल्ला कमिटीचे सदस्य आदी उपस्थित होते.

            सभेच्या सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी गणेशोत्सव व मोहर्र्म यासंदर्भात शासनाच्या सूचनांचे वाचन करून उपस्थितांना अवगत केले. सहा. धर्मदाय आयुक्त सोनवणे यांनी गणेश मंडळांच्या सार्वजनिक न्यास नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती दिली.  यावेळी नगरसेवक सिद्धार्थ शर्मा यांनी सर्व मंडळे शासनाच्या सूचनांचे पालन करतील, कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करतील,अशी प्रशासनाला ग्वाही दिली. तसेच मोतिसिंग मोहता यांनीही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे पालन करावे,असे आवाहन केले. तसेच मंडळांना आवश्यक सुविधा पुरवाव्या अशी मागणी केली. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी गणेशोत्सव व मोहर्र्म या काळात जिल्ह्यात अंमलात असणाऱ्या पोलीस बंदोबस्त व कायदा सुव्यवस्थेबाबत माहिती देऊन मंडळाचे पदाधिकारी यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. या उत्सव काळात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नियमांचे पालन करावे, असेही आवाहन केले.

            यावेळी जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, गणेशोत्सव साजरा करत असताना कोरोनाचे संकट कायम असल्याची जाणीव कायम ठेवा. कायदा सुव्यवस्था राखत असतांना लोकांचा जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक गणेश मंडळाने आपापल्या भागातील लोकांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या, अन्य आजारग्रस्त लोकांच्या रॅपिड अँटीजन टेस्ट, आर.टी. पी. सी. आर. चाचण्या करून घ्या. आपल्याकडे गंभीर कोरोना रुग्णांना वाचविण्यासाठी प्लाजमा संकलन केंद्र सुरू केले आहे. त्यासाठी प्लाजमा दाते मिळवून देण्यात आरोग्य यंत्रणेला मदत करा.त्यासाठी प्रचार, प्रसार करा. प्रत्येक मंडळाने प्लस ऑक्सिमिटर घेऊन आपापल्या भागात लोकांची ऑक्सिजन पातळी मोजण्याचे काम करावे, गणेश स्थापना ते विसर्जन या कालावधीत होणारे गर्दीचे प्रसंग टाळून आपण आपले व आपल्या परिवाराचे रक्षण करावे. कोरोनाचे संक्रमण रोखणे हीच खरी गणेश भक्ती होय, असे आवाहन त्यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ