सर्व शिक्षकांनी आजपासून (दि.१५) शाळेत उपस्थित रहावे- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश


अकोला
,दि.14 (जिमाका)- येत्या 15 ऑगस्ट पासून सर्व शिक्षकांना शाळेत उपस्थित रहावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज दिले.

पालकमंत्री ना. कडू यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात विविध विषयाच्या आढावा घेण्यात आला. यावेळी आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक वैशाली ठक, तसेच अन्य विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे इयत्ता पाचवीचे वर्ग पालकमंत्री यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा परिषद शाळा हातोला, ता.बार्शिटाकळी, पातुर नंदापूर ता.अकोला, किनखेड ता.अकोट, रिधोरा ता.बाळापूर, राजणापूर ता. मुर्तिजापूर, बाभुळगाव व चतारी ता. पातुर, माळेगाव बाजार ता. तेल्हारा येथे ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आले. या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांना शिक्षक मित्र व शिक्षकांच्या मदतीने मोबाईल, टिव्ही व रेडीओव्दारे अध्यापन व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती शिक्षणाधिकारी यांनी दिली.

ज्या शाळेतील वर्गाची पटसंख्या 10 आहे अशा शाळेत प्रत्यक्ष अध्यापन सुरु करण्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून दोन पाळीमध्ये शाळा सुरु करावी. पाच विद्यार्थ्यांचा गट करुन सकाळी 11 ते दोन व दुपारी दोन ते पाच अशा वेळेत त्यांना शिकवावे. यासाठी सामाजिक अंतर राखून तसेच शाळेचे निर्जंतुकीकरण शाळा सुरु होण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर करावे, तसेच शिक्षकांनी कोरोना तपासणी करुन घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हा परिषद तसेच नगर परिषदेच्या शाळेत येत्या सोमवारी सर्व शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे निर्देश पालकमंत्री ना. कडू यांनी दिले. शाळा कशा प्रकारे ऑनलाईन किवा ऑफलाईन पद्धतीने सुरु होवू शकतात, यासाठी नियोजन करावे. शाळेतील विद्यार्थी व पालक यांना भेटून त्यांचे मनोबल वाढवावे, अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या.

प्रलंबित विकास कामांचा आढावा

यावेळी पालकमंत्र्यांनी राज्यपातळीवर प्रलंबित विकास कामाचा जिल्हास्तरीय आढावा घेतला. यात सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, जिल्हा स्त्री रुग्णालयातील इमारतीचे बांधकाम, बोरगाव मंजू येथील 30 खाटाचे ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, अकोट आदी कामांचा समावेश होता. यासाठी आरोग्य मंत्री यांच्यासोबत बैठक घेवून सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडील अकोट व तेल्हारा तालुक्यातील 91 व 59 गावांकरीता प्रादेशिक पाणीपुरवठा, खांबोरा 60 गावे पाणीपुरवठा तसेच अकोला व बाळापूर तालुक्यातील एकूण 69 गावांकरीता प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, तसेच सांस्कृतीक भवनाचे बांधकामासाठी निधी व विमानतळ विस्तारीकणबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला. सर्व प्रलंबित विकास कामे संबंधित मंत्री व अधिकारी यांच्यासोबत बैठक घेवून मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री ना. कडू यांनी दिले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ