निर्बंध कालावधीत झाले एक लाख ४८ हजार ५०० शिवभोजन थाळ्यांचे मोफत वितरण
अकोला,दि.२ (जिमाका)- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा
घालण्यासाठी शासनाला कडक निर्बंधांची अंमलबजावणी १५ एप्रिल पासून सुरु झाली होती.
तेव्हापासून ते दि.३१ मे पर्यंतच्या कालावधीत अकोला जिल्ह्यात एक लाख ४८ हजार ५०० थाळ्यांचे मोफत वितरण झाले. त्यामुळे
जिल्ह्यातील गोरगरीब गरजू लाभार्थ्यांच्या पोटाला आधार झाला.
यासंदर्भात जिल्हा पुरवठा कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार, दि. १५ एप्रिलपासून जिल्ह्यात कडक निर्बंध सुरु झाले
होते. त्यापार्श्वभुमिवर रोजंदारीने कामावर जाणारे, गोरगरिब लोकांना भेडसावणारी जेवणाची समस्या सोडविण्यासाठी शासनाने अनेक
उपाययोजना केल्या. शिवभोजन थाळी ही त्यातीलच एक. त्या आधी शिवभोजन थाळी ही पाच
रुपये दराने उपलब्ध होत होती. निर्बंधांच्या कालावधीत हीच थाळी शासनाने विनामूल्य
तसेच शक्य तिथे पार्सल सुविधेद्वारे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार
अकोला जिल्ह्यातील १३ शिवभोजन थाळी केंद्रांवरुन जिल्ह्याभरात एक लाख ४८ हजार ५००
थाळ्यांचे मोफत वितरण झाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवभोजन थाळी
ही योजना दि.२६ जानेवारी २०२० पासून सुरु झाली. या
योजनेअंतर्गत गरीब व गरजू लोकांना दहा रुपये दराने भोजन दिले जाते. मात्र नंतर
कोरोना कालावधीत शासनाने हे दर पाच रुपये प्रतिथाळी याप्रमाणे केले. कडक
निर्बंधांच्या कालावधीत (दि. १५ एप्रिल पासून) आतापर्यंत जिल्ह्यातील १३
केंद्रामधुन एक लाख ४८ हजार ५०० थाळ्यांचे मोफत वितरण झाले. शहरी भागात
आपल्या विविध कामानिमित्त येणाऱ्या गोरगरिबांसाठी स्वस्त दरात स्वच्छ, पोषक आणि ताजे भोजन देणारी ही योजना असून त्याचा लाभ गरीब आणि
गरजू जनतेला होत आहेत. या शिवभोजन थाळीमध्ये ३० ग्रॅमच्या दोन चपाती, १०० ग्रॅमची एक वाटी भाजी, १५० ग्रॅमचा
एक मूद भात आणि १०० ग्रॅमचे एक वाटी वरण इतके भोजन देण्यात येते. शिव
भोजन थाळी योजनेला लोकांनी भरघोस प्रतिसाद देत आहे. कोविड संसर्गाच्या
पार्श्वभुमिवर शासनाने गरीब आणि गरजू व्यक्तींना फक्त पाच रुपये इतक्या कमी दरात
जेवण उपलब्ध करून दिले. तर आता संचारबंदीच्या कालावधीत शासनाव्दारे मोफत शिवभोजन
थाळीचे वितरण करण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा