कोविड १९ च्या स्थितीबाबत जिल्हा टास्क फोर्सची बैठक: प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय सुविधांच्या सज्जतेचे नियोजन

 





            अकोला, दि.२२ (जिमाका)- जिल्ह्यात कोविड १९ संसर्गाची स्थिती आटोक्यात असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचे अनुमान वर्तविण्यात आले आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय कोविड उपचार सुविधा तसेच अन्य अनुषंगिक  सेवांसाठी आरोग्य सुविधांच्या सज्जतेचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज यंत्रणांना दिले.

जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीचे आयोजन आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात करण्यात आले होते. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले,  डॉ. श्यामसुंदर शिरसाम, डॉ. आंभोरे, डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.

 जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे या कालावधीत लसीकरणाच्या मोहिमेला वेग यावा यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. त्यासाठी प्रत्येक नगरपालिकास्तरावर  चार नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्यात यावी. प्रत्येक आरोग्य केंद्र निहाय लसीकरणास वेग यावा व लोकांचा प्रतिसाद मिळावा यासाठी प्रोत्साहन योजना घोषित करावी, त्यासाठी आरोग्य यंत्रणा व जिल्हा परिषद यंत्रणा यांनी सुयोग्य प्रस्ताव तयार करावा. कोविडच्या अनुषंगाने जिल्ह्यात उभारण्यात आलेले ऑक्सिजन संयंत्रे या संयंत्रांची देखभाल सुव्यवस्थित ठेवावी, जेणेकरुन आपत्तीच्या प्रसंगी त्यांचा वापर करता आला पाहिजे. शिवाय त्यातून आवश्यकतेनुसार सिलिंडर मध्ये ऑक्सिजन भरुन  आवश्यकता असेल तेथे पाठवताही आला पाहिजे, यासाठी आवश्यक तांत्रिक सुविधाही निर्माण करुन घ्याव्या.  याशिवाय सुपर स्पेशालीटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करावयाच्या सुविधांचाही आढावा यावेळी घेण्यात आला. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुमानानुसार जिल्ह्यात कोविड केअर सेंटर व कोविड हॉस्पिटल्सचे नियोजन करण्यात यावे. तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय खाटांची संख्या वाढवून त्याठिकाणी ऑक्सिजन उपलब्धतेसह अन्य सर्व अनुषंगिक सुविधांची उपलब्धता करण्यात यावी ,असे निर्देशही जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी दिले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ